रत्नागिरी: शहरामध्ये ‘संविधान सन्मान मंचा’च्या वतीने गुरुवारी ‘राष्ट्ररक्षण मूक पदयात्रे’चे आयोजन करण्यात आले होते. सकाळी साडेअकरा वाजता मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून या पदयात्रेला सुरुवात झाली आणि जिल्हा रुग्णालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ तिची सांगता झाली.
नीट (NEET) परीक्षेच्या मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न आणि देशाच्या सुरक्षिततेला बाधा पोहोचवणाऱ्या विविध कृतींचा निषेध नोंदविण्यासाठी या मूक पदयात्रेचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

या पदयात्रेत रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातील विविध भागांतून, विशेषतः चिपळूणमधून हजारो नागरिक दाखल झाले होते. भाजप आणि शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह महिला, विद्यार्थी आणि विविध जाती धर्मातील नागरिकांनी या पदयात्रेत मोठी उपस्थिती दर्शवली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पदयात्रेचा समारोप झाल्यानंतर काही तरुणांनी भाषणे केली. यावेळी दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनाबाबत भूमिका मांडत राष्ट्रहिताच्या मुद्द्यांवर भाष्य करण्यात आले आणि शेवटी राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


