पुणे : येथील आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा २०२६ चा राष्ट्रीय गौरव पुरस्कार रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली-जालगाव येथील प्रशांत परांजपे यांना नुकताच प्रदान करण्यात आला आहे. पुणे महानगरपालिकेच्या घोले रोड येथील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात २३ जुलै रोजी पार पडलेल्या एका विशेष सोहळ्यात त्यांना हा सन्मान देण्यात आला.
पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.
प्रशांत परांजपे हे लेखक, पत्रकार, पर्यावरण अभ्यासक, साहित्यिक, संग्राहक, व्याख्याते, पर्यटन व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून विविध क्षेत्रांत अग्रेसर आहेत. निवेदिता प्रतिष्ठानच्या माध्यमातून ते पर्यावरण संवर्धन, सामाजिक आणि युवा प्रबोधन, मनोधैर्य योजना तसेच अनाथांसाठी मायेची चादर यांसारखे अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम सातत्याने राबवत असतात.
रत्नागिरीसह पालघर, पुणे, ठाणे, मुंबई आणि नाशिक यांसारख्या जिल्ह्यांमध्ये विविध संस्थांच्या सहकार्याने ते पर्यावरण संवर्धनाचे कार्य करतात. यशदा, पुणे अंतर्गत घनकचरा आणि जल व्यवस्थापन या विषयात ते तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम पाहतात, तसेच शाश्वत पर्यावरण विकास या विषयावर ते संपूर्ण महाराष्ट्रभर व्याख्यानांच्या माध्यमातून जनप्रबोधन करतात.
दापोली पोलीस ठाण्यात त्यांनी निवेदिता प्रतिष्ठानच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पहिले ‘इको-फ्रेंडली कायदा म्युझियम’ उभारले आहे. या अनोख्या म्युझियमच्या माध्यमातून पर्यटक आणि नागरिकांना वाहतूक नियम, पोक्सो कायदा आणि अंधश्रद्धा निर्मूलनाविषयी कायदेशीर प्रबोधन केले जाते.
याशिवाय ते महामहोपाध्याय भारतरत्न पां. वा. काणे स्मारक, दापोलीचे संस्थापक अध्यक्ष आणि पर्यावरण विषयी संस्था फेडरेशन, महाराष्ट्र राज्याचे मुख्य समन्वयक म्हणूनही कार्यरत आहेत. जल, जमीन आणि जंगल संवर्धनात त्यांचे मोठे योगदान असून, माणूस पाणी निर्माण करू शकतो आणि पोषक माती तयार करू शकतो, हे त्यांच्या चालू वर्षातील संशोधनाचे प्रमुख विषय आहेत.
त्यांच्या या बहुआयामी कार्यासाठी त्यांना कोलंबो विद्यापीठाच्या मानद डॉक्टरेटसह पत्रकारिता, सामाजिक आणि साहित्य क्षेत्रांतील अनेक जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

