– आशिष बल्लाळ, रत्नागिरी


सरकारी सेवेत सेवा बजावताना बरेच अनुभवसंपन्न माणसांंसोबत काम करण्याची संधी मिळते. काही वेळा त्यांच्याशी पटते तर काहीवेळा पराकोटीची विरोधी भावना निर्माण होते. गुहागर पोलीस ठाण्यात अशाच एका अवलिया सोबत काम करणेची संधी मिळाली. नाव सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस.वाय.रहाटे.

गुहागर पोलीस ठाण्यात हजर झालो नेमके त्या दिवशी पहिली व्यक्ती भेटली ती एस. वाय. रहाटे. भेदक नजर, भाषेत अजिबात गोडवा नाही, कानावर केस असलेला हा माणुस पहिल्याच भेटीत ‘ खतरनाक ’ वाटला. पहिल्या भेटीतच शिस्तिचे धडे त्यांनी दिले.

पोलीस ठाण्यात जसे दिवस जात होते तसा कुठेतरी बाजुला जावुन निवांत रहायचे असा मी प्रयत्न करीत होतो. परंतु तत्कालीन पोलीस निरिक्षक श्री.सकळे सरांनी रहाटे तो बल्लाळ तुमच्याकडे घ्या व त्याला काम शिकवा असे सांगितले. आता रहाटेंकडे काम शिकायचे म्हणजे माझ्या काळजात धस्स झाले होते. पण ए फोर साईजचा कागद पोलीस तपासाचे टिपण किंवा जबाब नोंदवताना कसा दुमडला पाहीजे ते समोरच्या व्यक्तिला टाचणी न लागता कशी दिली पाहीजे इथपासुनचे धडे रहाटेंच्या शाळेत गिरवायला मिळाले.

हा माणुस बाहेरुन जसा भयंकर, शीघ्रकोपी, खडूस दिसत होता. तितकाच आतुन प्रेमळ आहे. रहाटे भाऊ कधी गरीब श्रीमंत असा भेद न करता कायद्यात रहाल तर फायद्यात रहाल हे समजावुन सांगत होते वेळप्रसंगी शब्दांनी काळजात खोलवर जखमा करीत होते.

त्यांच्यासोबत काही दिवस काम केल्यावर त्यांच्यातला प्रेमळपणाही जाणवत होता. रहाटे भाऊंच्या बीटातले एक पोलीस पाटील त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची होती. मी एकदा होळीच्या बंदोबस्ताला भाऊंसोबत गेलो तर शृँगातळीच्या बाजारातुन भाऊंनी एक किलो बोकडाचे मटण घेतले. मी विचारल्यावर ते म्हणाले आपला तिथला पोलीस पाटील गरीब आहे, सणाला त्याच्या घरातही चार फोडं शिजायला हवीत. मी दरवर्षी त्याला होळी, गणपतीला मटण घेवुन जातो.

दुस-या एका प्रसंगात एका गावातील गावपुढारी रात्री दोन वाजता एका कॉलेज करणा-या मुलीला तिच्या आईवडीलांना घेवुन गावातील काही ग्रामस्थांसह पोलीस ठाण्यात आला. भाऊंनी मला ‘ बल्ल्या’ मुलीच्या आईवडीलांचा जबाब घे सांगीतले. गावपुढा-याची तक्रार ही होती की या मुलीचे कॉलेजमध्ये मित्र खुप आहेत व त्यामुळे आमच्या गावातील मुलींच्या मनावर परिणाम होतो. मला वाटले रहाटे भाऊ या मुलीला डोस देणार, भाऊंनी तिचे आईवडील व तिला एका बाजुला घेतले व कुटुंबप्रमुख या नात्याने बाजु समजुन घेतली. ते समजुन घेताना रहाटे भाऊंमधला बाप मला दिसत होता. सविस्तर विषय समजावल्यावर त्या गाव पुढा-याला बाजुला घेत त्यांना समजावले व निरोप घेताना शेठ, तुमच्या मुलांवर लक्ष ठेवा बरेचदा कॉलेज चुकवुन गुहागर बीचवर फिरताना दिसतात असे म्हणाले. गावपुढा-याला एक मुलगा व एक मुलगी होती त्यात ते काय समजायचे ते समजुन गेले व आपला लवाजमा घेवुन गावाकडे निघाले.

रहाटे भाऊंचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे आम्ही जेव्हा पोलीस स्टेशन ला जायचो तेव्हा भाऊ सकाळी सात वाजता आपली कामे आटोपुन बीट फिरण्यासाठी बाहेर जात असत. रहाटे भाऊंचा स्वभाव कडक शिस्तिचा व फटकळ असल्यामुळे त्यांचे जसे मित्र आहेत तसेच शत्रुही झाले पण त्यांना त्यांनी जवळुन पाहीले तो या माणसाबद्दल केव्हाही गैरसमज करुन घेणार नाही.

आज भाऊ सेवानिवृत्त होत आहेत. माझी त्यांची गेल्या सहा वर्षात प्रत्यक्ष भेट नाही पण त्यांच्याकडून शिकलेले धडे आयुष्यभर पुरणारे आहेत. अशा या रहाटे भाऊंना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देत त्यांच्या आरोग्यसंपन्न दिर्घायुष्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो..!

आशिष बल्लाळ – लेखक