मुंबई: अवकाळी पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे कोकणातील आंबा व काजू बागायतदारांचे अतोनात नुकसान झाले आहे. या हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई मिळावी, या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानावर शुक्रवार, १५ मे २०२६ रोजी भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती विनायक राऊत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
नुकसानग्रस्त बागायतदारांच्या शिष्टमंडळाने उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ येथे भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या होत्या. या समस्यांची दखल घेत, सरकारला जागे करण्यासाठी हा मोर्चा आयोजित केला आहे.
१५ मे रोजी सायंकाळी ४ वाजता गिरगाव चौपाटी ते वर्षा बंगला असा हा मोर्चा निघणार असून, यात हजारो बागायतदार सहभागी होऊन आपली ताकद दाखवणार आहेत.
या मोर्चाच्या नियोजनासाठी मुंबई, ठाणे आणि कल्याणमधील कोकणवासियांची तातडीची बैठक मंगळवार, १२ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता शिवसेना भवन, दादर येथे बोलावण्यात आली आहे.
या बैठकीला विनायक राऊत, अनिल परब, सुनील प्रभू, अरुण दुधवडकर, महेश सावंत आणि रमेश कोरगावकर मार्गदर्शन करणार आहेत.
कोकणच्या न्याय हक्कासाठी आयोजित या बैठकीला आणि मोर्चाला सर्व पदाधिकारी, पुरुष व महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विनायक राऊत यांनी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

