दापोली : ज्ञानदीप दापोली संचालित संतोषभाई मेहता इंग्लिश मीडियम स्कूलने दहावीच्या निकालात आपली उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.
या परीक्षेत आर्या पांगारकर हिने ९५.२०% गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला असून, इंग्रजी माध्यमातून दापोली तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.
शाळेचा निकाल अत्यंत उत्कृष्ट लागला असून साध्वी पवार हिने ९४.८०% गुणांसह द्वितीय, तर आर्या दळवी हिने ९४.६०% गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला आहे.
यावर्षी शाळेतून एकूण ६० विद्यार्थी परीक्षेस बसले होते, त्यापैकी ५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे ११ विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा अधिक गुण मिळवले असून २९ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत.
उर्वरित विद्यार्थ्यांमध्ये २२ जण प्रथम श्रेणीत, ५ जण द्वितीय श्रेणीत तर २ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे सेक्रेटरी सुयोग मेहता यांनी अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण परिश्रम, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळेच हे यश मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
केवळ गुण मिळवणे हेच उद्दिष्ट न ठेवता विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हे संस्थेचे ध्येय असल्याचेही त्यांनी सांगितले.
या यशाबद्दल संस्थाध्यक्षा सरोज मेहता, चिटणीस सुजय मेहता, स्कूल कमिटी चेअरमन संकेत मेहता, मुख्याध्यापिका चंदाली पारकर आणि सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

