मुंबई: राज्यातील महसूल विभागात मोठ्या प्रमाणावर तलाठी पदभरती प्रक्रियेला वेग आला असून महसूल व वनविभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून रिक्त पदांचा तपशील मागवला आहे.
२ एप्रिल २०२६ च्या सुधारित आकृतीबंधानुसार ‘ग्राम महसूल अधिकारी’ (तलाठी) संवर्गातील पदे भरण्यासाठी शासनाने हालचाली सुरू केल्या असून, यामुळे नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांना मोठा दिलासा मिळणार आहे.
महसूल व वनविभाग मंत्रालयाने सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात लेखी सूचना दिल्या आहेत. नवीन निर्णयानुसार महसूल विभागाचा आकृतीबंध निश्चित झाला असून रिक्त पदे भरण्यासाठी तातडीने पावले उचलली जात आहेत.
शासनाने सर्व जिल्ह्यांना आपापल्या क्षेत्रातील रिक्त पदांची ‘बिंदू नामावली’ मागासवर्गीय कक्षाकडून तपासून घेण्याचे निर्देश दिले आहेत.
ज्या जिल्ह्यांमध्ये ‘पेसा’ क्षेत्र लागू आहे, तिथे पेसा आणि बिगर पेसा क्षेत्राचे स्वतंत्र मागणीपत्र तयार करण्यास सांगण्यात आले आहे.
ही सर्व माहिती आणि मागणीपत्र विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत शासनाला ८ मे २०२६ पर्यंत सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. ही माहिती प्राप्त झाल्यानंतर ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे (MPSC) सोपवण्यात येणार आहे.
त्यामुळे यंदाची तलाठी भरती प्रक्रिया आयोगामार्फतच राबवली जाण्याची शक्यता अधिक आहे. ८ मे ची मुदत संपल्याने आता तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून लवकरच अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होईल, अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे.
प्रशासकीय कामात तलाठी पद अत्यंत महत्त्वाचे असल्याने आणि गेल्या काही काळापासून या भरतीची मागणी होत असल्याने, सरकारच्या या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

