खेड : तालुक्यातील अपेडे गावातील देऊळवाडी, म्हापरलेवाडी, सुतारवाडी आणि गुलबेवाडी या वाड्यांना जोडणाऱ्या पादचारी लोखंडी पुलाचे नुकतेच उत्साहपूर्ण वातावरणात लोकार्पण करण्यात आले.

कदम फाउंडेशनच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या या पुलामुळे परिसरातील ग्रामस्थांची अनेक वर्षांची प्रलंबित मागणी पूर्ण झाली असून त्यांची दैनंदिन वाहतूक आता अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार आहे.

पावसाळ्यात आणि इतर ऋतूंमध्ये या वाड्यांदरम्यान प्रवास करताना ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येची गंभीर दखल घेत कदम फाउंडेशनने सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून हा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला.

या पुलाच्या उभारणीमुळे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सन २०१७ पासून शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य आणि क्रीडा अशा विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या कदम फाउंडेशनने या पुलाच्या माध्यमातून ग्रामीण विकासाच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

या लोकार्पण सोहळ्याला संस्थेचे अध्यक्ष गणपत कदम, रविंद्र कदम, संतोष कदम, दीपक कदम, प्रविण कदम यांच्यासह फाउंडेशनचे इतर सर्व सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेणुका कदम यांनी केले, ज्यामध्ये त्यांनी फाउंडेशनच्या विविध सामाजिक उपक्रमांचा आढावा घेत या पुलाच्या उभारणीमागील मुख्य उद्देश उपस्थितांसमोर स्पष्ट केला.

कार्यक्रमाच्या शेवटी सुभाष म्हापरले यांनी सर्वांचे आभार मानले. या लोकोपयोगी उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण असून, ग्रामस्थांनी फाउंडेशनच्या कार्याचे विशेष कौतुक करत भविष्यातही अशाच समाजोपयोगी उपक्रमांची अपेक्षा व्यक्त केली आहे.