दापोली : तालुक्यात काल रात्रीपासून मुसळधार हजेरी लावली आहे. या पहिल्याच पावसाच्या जोरदार तडाख्याने चंद्रनगर येथील रमेश भुवड यांच्या मालकीच्या ‘हॉटेल पायसदान’ची संरक्षक भिंत आज सकाळी कोसळली.
रमेश भुवड यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य रस्त्यालगत असलेली सुमारे साठ फूट लांबीची ही पक्की चिरेबंदी भिंत पाण्याच्या प्रचंड दाबामुळे कोसळली आहे.
या घटनेत भुवड यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. हॉटेलची भिंत थेट दापोली-चंद्रनगर मुख्य रस्त्यावर कोसळल्याने या मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांनी आणि नागरिकांनी विशेष सावधानता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या ठिकाणी कोणताही अपघात होऊ नये यासाठी रमेश भुवड यांनी खबरदारीचा उपाय म्हणून रस्त्याच्या बाजूने चिरे लावून ठेवले आहेत. दरम्यान, या संपूर्ण घटनेची माहिती चंद्रनगरचे प्रशासक सकपाळ यांना देण्यात आली आहे.

