नवी दिल्ली : भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहण्याचा विक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी मोडला आहे.

लोकशाही मार्गाने निवडून आलेले पंतप्रधान म्हणून सर्वाधिक काळ पदावर राहण्याचा नवा मान आता नरेंद्र मोदी यांना मिळाला आहे.

१० जून रोजी, निवडून आलेले पंतप्रधान म्हणून मोदी यांचा ४,३९९ दिवसांचा कार्यकाळ पूर्ण झाला असून, नेहरूंचा निवडून आलेले पंतप्रधान म्हणून असलेला ४,३९८ दिवसांचा कार्यकाळ त्यांनी मागे टाकला आहे.

नेहरू १९५२ मध्ये पहिल्यांदा सार्वत्रिक निवडणुकीद्वारे पंतप्रधान म्हणून निवडून आले होते, तर त्यांचा १९४७ ते १९५२ हा कार्यकाळ हंगामी सरकारचे प्रमुख म्हणून होता.

निवडणुका पार न पडल्यामुळे नेहरूंचा हा सुरुवातीचा काळ निवडून आलेले पंतप्रधान म्हणून गणला जात नाही.

दरम्यान, २०२४ मध्ये मोदी यांनी सलग तीन निवडणुका (२०१४, २०१९ आणि २०२४) जिंकून नेहरूंच्या सलग तीन वेळा पंतप्रधान होण्याच्या ऐतिहासिक विक्रमाची आधीच बरोबरी केली आहे.

मोदी सरकारच्या बारा वर्षांच्या या कालखंडात देशात मोठी स्थित्यंतरे आली असून भारताची एक नवी ओळख निर्माण झाली आहे.

या काळात रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतूक क्षेत्रात गतीने क्रांती झाली असून २६ शहरांमध्ये १,१०० किलोमीटरहून अधिक मेट्रोचे जाळे पसरले आहे.

तसेच १६४ ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस धावत असून अटल सेतू, सुदर्शन सेतू आणि चिनाब रेल्वे ब्रिज यांसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण झाले आहेत.

देशातील विमानतळांची संख्या ७४ वरून थेट १६४ वर पोहोचली आहे. पायाभूत सुविधांसोबतच कृषी क्षेत्रात ‘पीएम किसान सन्मान निधी’ अंतर्गत ४.३ लाख कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले असून हमीभावावर २६ लाख कोटींची विक्रमी पीक खरेदी झाली आहे.

याशिवाय ४ कोटी शेतकऱ्यांना २ लाख कोटींचा पीक विमा मिळाला असून मध्यमवर्गीय नोकरदारांना दिलासा देत वर्षाला १२.७५ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे.