दापोली : तालुक्यातील प्रसिद्ध मुरुड समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षेला हरताळ फासत भरधाव वेगात कार चालवणाऱ्या एका अज्ञात चालकावर दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
८ जून २०२६ रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी हर्णे दूरक्षेत्राचे पोलीस कॉन्स्टेबल दिलीप बाळकृष्ण नवाले (बकल नंबर ३०४) यांनी ९ जून २०२६ रोजी दुपारी ३.३६ वाजता दापोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुरुड समुद्रकिनाऱ्यावर पांढऱ्या रंगाची इर्टिगा कार (क्रमांक MH-42-BJ-4746) घेऊन आलेल्या एका अज्ञात चालकाने आपली गाडी किनाऱ्यावरील वाळूत अत्यंत भरधाव वेगात आणि धोकादायक पद्धतीने चालवली.
समुद्रकिनाऱ्यावर फिरायला आलेल्या इतर पर्यटकांना या वाहनामुळे मोठी दुखापत होऊ शकते किंवा त्यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो, याची पूर्ण जाणीव असतानाही चालकाने बेजबाबदारपणे वाहन चालवले.
याप्रकरणी दापोली पोलिसांनी अज्ञात कार चालकाविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८१, १२५ आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ सह भा.द.वि.क. २७९, ३३६ अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर ११७/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या अज्ञात कार चालकाचा शोध घेत असून पुढील तपास करत आहेत.

