रत्नागिरी : माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे खासदार नारायण राणे गुरुवारी, २५ जून २०२६ रोजी रत्नागिरी दौऱ्यावर येत असून दिवसभर विविध शासकीय, सामाजिक, कृषी तसेच जनसंपर्काच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.
नारायण राणे यांच्या या दौऱ्यामुळे जिल्ह्यातील शासकीय यंत्रणा आणि राजकीय कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. ते या दौऱ्याच्या निमित्ताने विविध विकासकामांचा आढावा घेण्यासोबतच नागरिकांशी थेट संवाद साधणार आहेत.
या दौऱ्याची सुरुवात सकाळी ११ वाजता जयस्तंभ येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीने आणि आढावा बैठकीने होणार आहे.
या बैठकीत जिल्ह्यातील विविध शासकीय कामांचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर सकाळी ११:३० वाजता मारुती मंदिर येथील हॉटेल विवा एक्झिक्युटिव्ह येथे संविधान हत्या दिनानिमित्त आयोजित प्रदर्शनाचे उद्घाटन नारायण राणे यांच्या हस्ते होईल.
या ठिकाणी ‘आणीबाणीची ५१ वर्षे – विचारमंथन आणि व्याख्याने’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात संजय केतकर आणि विवेक भावे हे व्याख्यान देणार असून नारायण राणे प्रमुख मार्गदर्शक म्हणून संबोधित करतील.
याच कार्यक्रमात दक्षिण आफ्रिकेतील ९० किलोमीटरची प्रतिष्ठित कॉम्रेड्स मॅरेथॉन स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या रत्नागिरीतील धावपटू अभिजीत पड्याळ आणि प्रसाद देवस्थळी यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
यानंतर दुपारी १:१५ वाजता ते कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन जनतेची विविध निवेदने स्वीकारतील.
दुपारच्या सत्रात ३ वाजता भाट्ये येथील कृषी विभागाच्या नर्सरीमध्ये शासनाच्या ‘मागेल त्याला काजू’ या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना काजू कलमांचे वाटप नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत केले जाईल.
त्यानंतर दुपारी ३:३० वाजता ते भाट्ये येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या नारळ संशोधन केंद्राला सदिच्छा भेट देऊन तेथील शास्त्रज्ञांशी व अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.

