रत्नागिरी: मुस्लिम युवक महाराष्ट्र संघटनेने एका महिला प्रवक्त्याने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. करोडो मुस्लिमांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रेषित मुहम्मद आणि आयेशा यांच्याविषयी या संबंधित महिलेने अत्यंत निंदनीय आणि अपमानास्पद वक्तव्य केले आहे.
या वक्तव्यामुळे संपूर्ण मुस्लिम समाजाच्या भावना तीव्रतेने दुखावल्या गेल्या असून, समाजात कमालीचा असंतोष पसरला असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
सामाजिक सलोखा आणि शांतता बिघडवण्याचा हा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न असून, या प्रकरणाची प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आणि समाजात द्वेष पसरवल्याप्रकरणी या संबंधित महिला आरोपीवर कठोरात कठोर कलमांखाली तात्काळ गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात यावी, अशी आक्रमक भूमिका उटंबर-केळशी येथील पीर याकुब बाबा सरवरी दर्गा ट्रस्टचे अध्यक्ष व खादीम मकबूल दिनवारे आणि मुस्लिम युवक महाराष्ट्र संघटनेने घेतली आहे.

