दापोली : तालुक्यातील खेडर्डी माळवाडी येथे एका विहिरीत पडलेल्या जखमी भेकराची वनविभागाने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सुखरूप सुटका केली आहे. २३ जून रोजी गावातील पांडुरंग केळकर यांनी त्यांच्या विहिरीत भेकर पडल्याची माहिती वनविभागाला दिली होती.

या माहितीची दखल घेत दापोली वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली व ग्रामस्थांच्या सहकार्याने भेकराला विहिरीबाहेर काढले.

विहिरीतील खडकावर आपटल्याने या भेकराचा समोरील उजवा पाय गुडघ्यापासून मोडल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पशुधन विकास अधिकारी मुकुंद लोंढे यांच्याकडून या भेकराची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करून घेण्यात आली.

प्रकृतीचे गांभीर्य ओळखून पुढील उपचारांसाठी या जखमी भेकराला विनाविलंब एका विशेष वाहनाने पुण्यातील रेस्क्यू सेंटरमध्ये पाठवण्यात आले असून सध्या तिथे त्याच्यावर अधिक उपचार सुरू आहेत.

भेकर हा वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ च्या शेड्युल १ मधील संरक्षित तृणभक्षी प्राणी आहे. या वन्यजीवाची शिकार करणे किंवा त्याला बाळगणे हा अत्यंत गंभीर गुन्हा असून, असे कृत्य करणाऱ्याला ३ ते ७ वर्षांची शिक्षा आणि २५ हजार रुपये दंडाची तरतूद आहे.

याशिवाय गुन्ह्यात वापरलेली मालमत्तादेखील सरकारजमा होऊ शकते. ही संपूर्ण बचाव मोहीम विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई आणि सहायक वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल प्रकाश पाटील, वनपाल रामदास खोत, वनरक्षक विश्वंबर झाडे आणि वन्यजीव प्रेमी किरण करमरकर यांनी यशस्वीपणे पार पाडली.

दापोली तालुक्यात वन्यजीव लोकवस्तीत आल्यास, तसेच ते जखमी, अनाथ किंवा संकटात असल्याचे आढळल्यास नागरिकांनी तत्काळ हॅलो फॉरेस्टच्या १९२६ या टोल-फ्री क्रमांकावर किंवा वनक्षेत्रपाल पी. जी. पाटील यांच्या ७४९९५७५८९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.