मुंबई – महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे मराठी भाषा दिनानिमित्त विविध मान्यवर साहित्यिक आणि प्रकाशन संस्थांना गौरविण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

पुरस्कार वितरण सोहळा गेटवे ऑफ इंडिया येथे भव्य स्वरूपात
मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, मराठी भाषा गौरव दिनानिमित्त दिले जाणारे पुरस्कार मोठ्या दिमाखात साजरे होण्याची गरज आहे.

त्यामुळे यावर्षीपासून हे पुरस्कार गेटवे ऑफ इंडिया येथे भव्य स्वरूपात प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या पुरस्कार निवडीसाठी साहित्य क्षेत्रातील तज्ज्ञ समित्या कार्यरत असून, निवड प्रक्रियेत कुठलाही हस्तक्षेप किंवा वशिलेबाजी होत नाही.

या वर्षीचे प्रतिष्ठेचे ‘विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब गंगाराम बोराडे यांना जाहीर करण्यात आला आहे.

तसेच ‘श्री. कु. भागवत पुरस्कार’ प्रकाशन संस्थेसाठी ज्योत्स्ना प्रकाशन, पुणे यांना देण्यात येणार आहे.

इतर महत्त्वाचे पुरस्कार:

  • डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार – डॉ. रमेश सीताराम सूर्यवंशी
  • मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार – भीमाबाई जोंधळे
  • कवी केशवसूत पुरस्कार – एकनाथ पाटील
  • राम गणेश गडकरी नाटक/एकांकिका पुरस्कार – मकरंद साठे
  • हरिनारायण आपटे कादंबरी पुरस्कार – आनंद विणकर
  • दिवाकर कृष्ण लघुकथा पुरस्कार – दिलीप नाईक निंबाळकर
  • अनंत काणेकर ललित गद्य पुरस्कार –अंजली जोशी
  • श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार – शेखर गायकवाड
  • न. चिं. केळकर पुरस्कार – विवेक गोविलकर
  • लक्ष्मीबाई टिळक आत्मचरित्र पुरस्कार – डॉ. वसंत राठोड
  • श्री. के. क्षीरसागर समीक्षा पुरस्कार – समीर चव्हाण
  • शाहू महाराज पुरस्कार- प्रकाश पवार
  • नरहर कुरुंदकर पुरस्कार- उज्ज्वला जोगळेकर
  • महात्मा ज्योतिराव फुले पुरस्कार- सुबोध जावडेकर
  • वसंतराव नाईक पुरस्कार- डॉ. विजय बोरा
  • लोकशाहिर अण्णाभाऊ साठे पुरस्कार- सुनीता सावरकर
  • ना. गो. नांदापूरकर पुरस्कार – या.रा. जाधव
  • कर्मवीर भाऊराव जाधव पुरस्कार- हेमंत चोपडे
  • डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार- माधव गाडगीळ
  • रा.ना. चव्हाण पुरस्कार- संपादक रविमुकुल
  • तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार- अनुवादक श्रीकांत अरुण पाठक
  • भाई माधवराव बागल पुरस्कार- सुप्रिया राज
  • बालकवी पुरस्कार -प्रशांत असनारे
  • भा.रा. भागवत पुरस्कार संजय शिंदे
  • साने गुरुजी पुरस्कार- रेखा बैजल
  • बहिणाबाई चौधरी पुरस्कार – तान्हाजी रामदास बोर्हाडे
  • विजय तेंडुलकर पुरस्कार- हरीश बोढारे
  • श्री. ना. पेंडसे पुरस्कार- प्रदीप कोकरे
  • ग. ल. ठोकळ पुरस्कार – डॉ. संजय कुलकर्णी
  • ताराबाई शिंदे पुरस्कार – गणेश मनोहर कुलकर्णी
  • सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार – अनुवादक योगिनी मांडवगणे

साहित्याच्या विकासासाठी ‘कवितांचं गाव’ आणि ‘पुस्तकांचं गाव’ संकल्पना
यंदाच्या मराठी भाषा दिनानिमित्त दोन महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू करण्यात येत आहेत.

‘कवितांचं गाव’ ही संकल्पना कुसुमाग्रजांचे वास्तव्य असलेल्या नाशिकमधील शिरवाड येथे राबवली जाणार आहे.

या उपक्रमांतर्गत गावातील ३५ घरांमध्ये वाचनालय स्थापन करून केवळ कवितांची पुस्तके ठेवली जातील.

तसेच ‘पुस्तकांचं गाव’ रत्नागिरी जिल्ह्यातील स्मारक गावात सुरू करण्यात येणार आहे.

येथे ३५ घरांमध्ये प्रत्येकी १,००० नवी कोरी पुस्तके ठेवली जातील, जेणेकरून लहान मुले, युवक आणि वाचकवर्गाला दर्जेदार साहित्य वाचता येईल.

हा पुरस्कार वितरण सोहळा २७ फेब्रुवारी २०२४ रोजी संध्याकाळी ६ वाजता गेटवे ऑफ इंडिया, मुंबई येथे संपन्न होणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत हा दिमाखदार सोहळा पार पडेल.

तसेच, ‘कवितांचं गाव’ या उपक्रमाचे उद्घाटन २७ फेब्रुवारीला कुसुमाग्रजांच्या वास्तव्यस्थानी होईल, तर ‘पुस्तकांचं गाव’ पुढील महिन्यात औपचारिकरित्या सुरू करण्यात येणार आहे.

भविष्यात प्रत्येक जिल्ह्यात असे उपक्रम राबवण्याचा मानस मराठी भाषा विभागाचा आहे.

मंत्री उदय सामंत यांनी राज्य शासनाच्या वतीने सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आणि मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांना साहित्यप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले.