रत्नागिरी जिल्ह्यातील लाडक्या बहिणी संतापल्या
रत्नागिरी – मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या चौकशीच्या निर्णयावरून आता लाडक्या बहिणी संतप्त झाल्या आहेत. आमच्याकडे ज्या अंगणवाडी सेविका चौकशीला येणार आहेत त्यांनी, आम्ही दिलेली मते परत घेऊनच चौकशीला यावे, असा संतप्त सूर रत्नागिरी जिल्ह्यातील बहिणींतून आता उमटत आहेत.
आम्हाला योजनेचा लाभ देणाऱ्यांवर कारवाई करा
आम्हाला ज्यांनी विना चौकशी पात्र ठरवून आमच्या खात्यात पैसे जमा केले त्यांना दोषी मानून त्यांच्यावर कारवाई करा, त्यांची चौकशी करा, आमची कसली चौकशी करताय.
मते दिलीत ना आम्ही मग ती मते परत घेऊन या आणि सरसकट योजनाच बंद करा, अशा आशयाचा सूर व्यक्त करत राज्यभरातील लाडक्या बहिणींमध्ये आता फडणवीस सरकार विरोधात संताप व्यक्त होऊ लागला आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन असेल, तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
हा जुनाच निकष आहे. मात्र त्याची मते मिळविल्यानंतर शहानिशा करून शासनाने नव्या निकषांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला असून दि. ४ तारखेपासून अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत.
लाभार्थ्यांकडे चारचाकी वाहन आहे का? याची होणार चौकशी
शासनाने चारचाकी वाहन असलेल्या अर्जदारांना अपात्र घोषित करण्याचे ठरवले आहे. महिला व बालकल्याण विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतलेल्या बैठकीत राज्यभरातील अधिकाऱ्यांना यासंदर्भात सूचना दिल्या.
परिवहन विभागाच्या मदतीने वाहनधारकांची यादी तयार करून जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आली आहे.
यावर लाडक्या बहिणींचे मत असे आहे कि, आमची मते देखील आता अपात्र ठरवून सरकार बनवा अशी मागणी लाडक्या बहिणींनी केली आहे.
अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन करणार चौकशी!
शासनाच्या आदेशानुसार, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी (सीडीपीओ) हे महिलांच्या घरी जाऊन पडताळणी करतील.
चारचाकी वाहन असलेल्या अर्जदारांची नावे शासनाकडे पाठवली जातील.लाभार्थी महिलेचे वय १८ ते ६५ वर्षांच्या दरम्यान असावे.
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आत असावे.
कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा तसेच प्राप्तिकर भरणारा नसावा.
संजय गांधी निराधार योजनेसारख्या अन्य योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
कुटुंबाच्या नावावर चारचाकी वाहन असल्यास अर्जदार अपात्र ठरेल.
लाडक्या बहिणींमधून संमिश्र प्रतिक्रिया
महिला वर्गातून या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी शासनाच्या या निर्णयाचे समर्थन केले असले, तरी अनेक महिलांनी यावर संताप व्यक्त केला आहे.
त्यांचे म्हणणे आहे की, घरात चारचाकी वाहन असणे म्हणजे श्रीमंत असणे नव्हे
अनेक वेळा वडिलांच्या नावावर किंवा भावाच्या नावावर गाडी असते, पण कुटुंबाची आर्थिक परिस्थिती तशी चांगली नसते.
काही लाडक्या बहिणी तर म्हणाल्या आमचा पती, मुलगा टूरिस्टचा व्यवसाय करतो, आता काय त्याने व्यवसाय बंद करायचा काय ? असा थेट सवाल त्यांनी शासनाला केला आहे.