रत्नागिरी : शहरातील वीर सावरकर सभागृहात भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालयाचा पहिला वर्धापन दिन नुकताच हजारो नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात बोलताना माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी कोकणच्या विकासासाठी आणि परिवर्तनासाठी जिजाऊ संस्था आणि निलेश सांबरे यांच्यासारख्या नेतृत्वाची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन केले.
कोकणी माणसात प्रचंड क्षमता असून त्यांना योग्य संधी मिळाल्यास ते संपूर्ण जगाला दिशा दाखवू शकतात, असा विश्वास प्रभू यांनी व्यक्त केला.

केवळ वरवरची कामे न करता गावागावात तळागाळात जाऊन काम केल्याशिवाय कोकणाचे खऱ्या अर्थाने परिवर्तन होणार नाही, असेही ते म्हणाले.
कोणताही सामान्य रुग्ण पैशाअभावी उपचाराविना राहू नये या उदात्त हेतूने जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी पालघर आणि ठाण्यानंतर रत्नागिरीत १५० खाटांचे सुसज्ज असे भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालय सुरू केले आहे.
या रुग्णालयाने अवघ्या वर्षभरात तब्बल ४७ हजारांहून अधिक रुग्णांवर मोफत उपचार केले आहेत. यात आयसीयूपासून ते कर्करोग आणि हृदयावरील गंभीर शस्त्रक्रियांचा, तसेच सर्व निदान चाचण्या व मोफत औषधांचाही समावेश आहे.
या रुग्णालयाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला निवृत्त सनदी अधिकारी इंद्रजित देशमुख, निवृत्त एअर मार्शल हेमंत भागवत, सकाळचे संपादक राहुल गडपाले, जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे, भगवान सांबरे, भावनादेवी सांबरे, सिंधुदुर्गचे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उद्योजक रवींद्र सावंत आणि जिजाऊ संघटनेचे कार्याध्यक्ष धीरज सांबरे यांच्यासह अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या भव्य कार्यक्रमात सुरेश प्रभू यांना जिजाऊ संस्थेतर्फे ‘कोकणरत्न पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले, तर हेमंत भागवत यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यासोबतच, नकुल पार्सेकर लिखित आणि सुरेश प्रभू यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘ध्येयधुंद’ या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते पार पडले.
तसेच जिजाऊ संस्थेच्या मोफत पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण घेऊन नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीत यश मिळवलेल्या ३५ विद्यार्थ्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेंद्र मांडवकर यांनी केले तर सूत्रसंचालन अमर राऊत यांनी केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी निलेश सांबरे यांच्या कार्याचे मुक्तकंठाने कौतुक केले. निवृत्त सनदी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी आपल्या भाषणात सांगितले की, इतिहास नेहमी स्वतःचे सर्वस्व देणाऱ्यांचा लिहिला जातो, स्वतःसाठी कमवणाऱ्यांचा व साठवणाऱ्यांचा नाही. जेव्हा करुणेला प्रत्यक्ष कृतीची जोड मिळते, तेव्हाच निलेश सांबरे यांच्यासारखा कर्मवीर तयार होतो.
राहुल गडपाले यांनी मुंबईतील अनेक बड्या धर्मदाय रुग्णालयांचा संदर्भ देत स्पष्ट केले की, जिजाऊसारखे औषधांसह शंभर टक्के मोफत उपचार देणारे रुग्णालय कुठेही पाहायला मिळत नाही. सांबरे यांनी केवळ आरोग्यच नाही तर शिक्षण आणि समाजसेवेच्या माध्यमातून माणसांची जी मोठी फळी उभी केली आहे, ती त्यांना भविष्यात राजकारणापेक्षाही खूप मोठे यश मिळवून देईल.
या सर्व भावनांना उत्तर देताना निलेश सांबरे यांनी रत्नागिरीकरांना दिलेला शब्द पूर्ण केल्याचे समाधान व्यक्त केले. पैशाअभावी कोणाचेही उपचार थांबले नाहीत यातच आपले खरे यश असून, पोलीस भरतीत निवड झालेले ३५ विद्यार्थी ही कोकणातील एक नवी आणि सक्षम पिढी घडविण्याच्या प्रयत्नांची केवळ सुरुवात असल्याचे सांबरे यांनी स्पष्ट केले.


