चिपळूण: येथील कामये उपजिल्हा रुग्णालयातील वर्ग १ ची वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन शिरीष मदार (वय ४८, सध्या रा. बी-४०६, परांजपे स्किम, पागमळा, चिपळूण) यांना ४ हजार ५०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले.
एका गरोदर महिला तक्रारदाराला गर्भपाताचे किट (गोळ्या) देण्यासाठी डॉ. कांचन मदार यांनी लाचेची मागणी केली होती. ही कारवाई बुधवार, ३ जून २०२६ रोजी करण्यात आली असून यामुळे वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.
या प्रकरणातील तक्रारदार महिलेला गर्भपात करायचा असल्याने तिने कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात जाऊन वैद्यकीय अधिकारी कांचन मदार यांची भेट घेतली होती.
यावेळी गर्भपातासाठी आवश्यक असणाऱ्या गोळ्यांचे किट देण्यासाठी कांचन मदार यांनी ४ ते ५ हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार नोंदवली.
एसीबीच्या पथकाने या तक्रारीची पडताळणी केली असता, वैद्यकीय अधिकारी कांचन मदार यांनी तक्रारदाराकडे ४ हजार ५०० रुपयांची लाच मागितल्याचे आणि ती रक्कम लागलीच स्वीकारण्यास संमती दर्शविल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार एसीबीच्या पथकाने तातडीने सापळा रचला. कांचन मदार यांनी तक्रारदाराकडून ४ हजार ५०० रुपयांची लाचेची रक्कम आपल्या खाजगी चारचाकी वाहनात (क्रमांक एमएच ०८ एएक्स २६१८) स्वीकारली.
लाच स्वीकारताच उपस्थित पंचांसमक्ष डॉक्टरला जागीच ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
ही कारवाई ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे आणि सुहास शिंदि यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी युनिटचे पोलीस उप अधीक्षक अविनाश पाटील, पोलीस निरीक्षक सुहास रोकडे, मच्छिद्र जाधव आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरीतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास कृपया टोल फ्री क्रमांक १०६४, दूरध्वनी ०२३५२/२२२८९३, मोबाईल ७५८८९४१२४७ किंवा व्हॉट्सॲप क्रमांक ७०३८३९१०६४ वर संपर्क साधावा. तसेच acbratnagiri@gmail.com या ईमेलवर आपली तक्रार नोंदवावी.

