रत्नागिरी: मराठी साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारे वाङ्मयीन व वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. हे पुरस्कार नुकतेच कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ग्रंथ निवड व पुरस्कार समितीचे प्रमुख प्रा. अशोक रामचंद्र ठाकूर यांनी जाहीर केले.
दरवर्षी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने वाङमयीन व वाङमयेतर पुरस्कारासाठी विहित कालावधीतील प्रस्ताव मागितले जातात.
त्यानुसार आलेल्या प्रस्तावाची परिक्षकाकडून छाननी केली जाते. त्यानंतर कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने पुरस्कार जाहीर केले जातात. त्यानुसार हे पुरस्कार जाहीर केले आहेत.
सन २०२१ – २२ चे पुरस्कार पुढीलप्रमाणे आहेत. कादंबरी विभागात प्रथम क्रमांक र. वा. दिघे स्मृती पुरस्कार अशोक समेळ यांना (पुस्तक ‘ते आभाळ मिष्माचे होते) तर द्वितीय क्रमांक वि. वा. हडप स्मृती पुरस्कार भारती मेहता यांना (कादंबरी “सुटका”), कथा विभागात प्रथम क्रमांक वि. सी. गुर्जर स्मृती पुरस्कार विवेक वसंत कुडू यांना (कथासंग्रह “चार चपटे मासे) तर द्वितीय क्रमांक विद्याधर भागवत स्मृती पुरस्कार माधव सावरगावकर यांना (कथासंग्रह गावगोत), कविता विभागात प्रथम क्रमांक आरती प्रभू स्मृती पुरस्कार अनुपमा उजगरे यांच्या (कवितासंग्रह “काजव्यांचे झाड”), तर द्वितीय क्रमांक वसंत सावंत स्मृती पुरस्कार प्रतिभा सराफ यांच्या (कवितासंग्रह “उमलावे”), आत्मचरित्र विभागात प्रथम क्रमांकाचा धनंजय कीर स्मृति पुरस्कार मुरलीधर नाले यांना (पुस्तक “संध्या समई”), चरित्र विभागात श्रीकांत शेट्ये स्मृती पुरस्कार अशोक चिटणीस यांना (पुस्तक ‘वेचित आलो सुगंध मातीचे”), समीक्षा विभागात प्रभाकर पाध्ये स्मृती पुरस्कार डॉक्टर फादर टॉनी जॉर्ज यांना (पुस्तक “गोष्ट एका सांस्कृतिक अपूर्व संगमाची”), नाटक विभागाचा भाई भगत पुरस्कार प्राध्यापक विजया पंडितराव यांना (नाटक “कोंडवाडा आणि दोन एकांकिका), तर ललित गद्य विभागातील अनंत काणेकर स्मृती पुरस्कार साहेबराव ठाणगे यांना (पुस्तक “सोयरे सकळ ), बालवाङमय विभागाचा प्र. श्री. नेरुरकर स्मृती पुरस्कार स्वप्नील चाफेकर यांना (पुस्तक “मनी माऊचं पिल्लू”), संकीर्ण विभागातील प्रथम क्रमांकाचा वि. कृ. नेरुरकर स्मृती पुरस्कार जॉन गोन्सालवीस यांना (पुस्तक “ज्याच्या हाती पुस्तक”), तर द्वितीय क्रमांकाचा अरुण आठल्ये स्मृती पुरस्कार सतीश नथुराम पाल यांना (पुस्तक “आम्ही कुणबी) आणि वैचारिक विभागासाठीचा फादर स्टीफन सुवार्ता पुरस्कार प्रशांत राऊत यांना (पुस्तक “आनंद नांदे अंबरी”) मिळाला आहे. तर कोकण मराठी साहित्य परिषदेचे संपादन, कथासंग्रह, कादंबरी विभागातील विशेष पुरस्कार अनुक्रमे अनुराधा नेरुरकर, स्नेहल फणसळकर, वैशाली पंडित यांना जाहीर झाले आहेत.
यासोबतच वाङ्मयेतर पुरस्कारांमध्ये पालघर व ठाणे जिल्ह्यात साहित्य, पर्यावरण, शिक्षण, आदी क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिला जाणारा कै पद्मश्री भाऊसाहेब वर्तक प्रतिष्ठान पुरस्कार सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्रा. डॉ. किरण सावे यांना तर संपूर्ण कोकणात साहित्य, पर्यावरण, शिक्षण क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तीला देण्यात येणारा श्री. बा. कारखानीस पुरस्कार देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद मधुकर भागवत यांना जाहीर करण्यात आले आले आहेत.
गुरुवर्य अ. आ. देसाई कोमसाप कार्यकर्ता पुरस्कार नवी मुंबईच्या सीबीडी शाखेचे शामसुंदर गावकर व रायगड जिल्ह्यातील नवीन पनवेल शाखेचे विलास पुंडले यांना, राजा राजवाडे स्मृती वाड्मयीन कार्यकर्ती पुरस्कार ठाण्याच्या मनीषा चव्हाण व पालघर मधील बोईसर शाखेच्या मधुमती कुलकर्णी, वामनराव दाते स्मृती उत्कृष्ट कोमसाप शाखा पुरस्कार रत्नागिरीतील मालगुंड शाखा व मुंबईतील बांद्रा शाखेस, ग्रामीण भागातील स्त्री लेखिकेसाठीचा सौ. नमिता कीर लक्षवेधी पुरस्कार ठाण्याच्या मीना मधुकर घोडविंदे यांना तर सुलोचना मुरारी नार्वेकर स्मृती पुरस्कार सावंतवाडीच्या उज्वला विलास गोवेकर यांना, उमेदीच्या गुणवंत कवीस देण्यात येणारा कवी उमाकांत कीर स्मृति काव्य पुरस्कार पालघरचे कमलाकर राऊत यांना आणि युवा विभागात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला देण्यात येणारा कोमसाप युवा कार्यकर्ता पुरस्कार मुरुडच्या सिद्धेश संतोष लखमदे यांना जाहीर झाला आहे.
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या वाङमयीन व वाड्मयीन पुरस्कार विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.
सन २०२१ – २२ मधील सर्व पुरस्कार प्राप्त सर्वांचे कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर, कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, विश्वस्त प्रमुख रमेश कीर, रेखा नार्वेकर, अरूण नेरूरकर यांच्यासह कोकण मराठी साहित्य परिषद परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.