पुन्हा एकदा कोकणावर ताशेरे ओढणाऱ्या एका पोस्टवरच्या काही कमेंट्स वाचनात आल्या. आजकाल शक्यतोवर या विषयावर लिहिणं मी टाळते पण कालपासून अनेकांनी सांगून सांगून यात ओढलंच मला शेवटी.
तर मूळ पोस्ट एका ताईंना आणि त्यांच्या कुटुंबियांना आलेल्या एका कटू अनुभवाबद्दल होती. त्याबद्दल खर तर मला काहीच म्हणायचं नाही, कारण असे अनुभव कोणालाही कुठेही येऊ शकतात.
माणसं म्हणजे देव नाहीत त्यामुळे त्यात कमीजास्त असणारच.
मुद्दा आहे त्याखाली येत गेलेल्या अनेक कमेंट्सच्या सुराचा. त्या अनुषंगाने बोलल्या गेलेल्या काही गोष्टींचा.
मुळात पालघर ते सावंतवाडी एवढा विस्तृत भाग कोकणात समाविष्ट आहे.
पार या टोकापासून त्या टोकापर्यंत पसरलेल्या या कोकणात अगदी पन्नास पन्नास किलोमीटरवर माणसाचं वागणं, चालणं, बोलणं, राहणीमान, जगण्याच्या पद्धती, कुलाचार, देवतार्जन अशा अनेक गोष्टीत बदल जाणवतात.
देवगडचा माणूस आणि राजापूरचा माणूस याच्या बोलण्याच्या लकबीत, खाण्यापिण्यात फरक होतो तसाच इतर अनेक गोष्टीत जाणवण्याइतपत फरक असतो.
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे दोन वेगवेगळे जिल्हे आहेत आणि दोन्हीच्या संस्कृतीत बराच फरक आहे. रत्नागिरी जिल्हा पूर्वीपासून प्रसिद्ध असल्यामुळे फार पूर्वीपासून पर्यटक गुहागर, दापोली, दिवेआगर, गणपतीपुळे वगैरे भागात येत असतात.
त्यामानाने तळकोकण पर्यटनाच्या दृष्टीने अलीकडे लोकांना माहीत होऊ लागलं आहे.त्यातल्या त्यात अनेक लोकांना मालवण माहीत आहे पण बाकी भाग नाहीच.
आजवर कोकणाला नाव ठेवणाऱ्या किंवा तक्रारी असणाऱ्या ज्या काही पोस्ट माझ्या वाचनात आल्यात त्यातल्या 95% या गुहागर, दिवेआगर, दापोली किंवा त्या भागाबद्दलच्या होत्या.
आलेही असतील लोकांना काही वाईट अनुभव. होऊ शकतच असं. पण मुद्दा हा आहे की, या सगळ्याबद्दल बोलताना लोक सरसकट अखंड कोकणाला नाव ठेऊन मोकळे होतात.
हे म्हणजे अस झालं की, एखाद्या घरात गेल्यावर त्यातल्या एखाद्या व्यक्तीमुळे आपल्याला वाईट अनुभव आलाच तर सरसकट अखंड कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रकार.
दुसरा भाग असा की, बाहेरून येणाऱ्या अनेक लोकांना (जे बरेचदा लहानमोठ्या शहरातूनच आलेले असतात खेड्यातून येणारे कदाचित त्या मानाने कमी असावेत) शहरात जसं रात्री 11 वाजता गेलं तरी हव्या त्या गोष्टी मिळतात तशाच इथेही आपण म्हटल्यावर मिळाव्यात अशी बरेचदा अपेक्षा असते.
इथल्या लोकांनी त्यांच्या सेवेत ते म्हणतील तेव्हा आणि तसं हजर असावं असा बऱ्याचदा attitude असतो.
(हे वाक्य मी अत्यंत जबाबदारीने लिहीत आहे कारण अनेकांना असे अनुभव आले आहेत. सरसकट सगळ्याच लोकांना हे लागू होत नाही पण बऱ्याच लोकांच्या बाबतीत हे घडतं.)
शक्यतोवर इथली हॉटेल्स रात्री 10 पर्यंत सुरू असतातच. पण लहान गावं असल्यामुळे येणारे लोक तुलनेत कमी असल्यामुळे त्यानंतर शक्यतोवर हॉटेल्स बंद होतात.
सकाळी साधारण साडेसात आठ पासून पुन्हा हॉटेल्स सुरू होतातच. इथला सर्वसामान्य माणूस हा जनरली पहाटे 4-5 वाजल्यापासून उठून कामाला लागलेला असतो त्यामुळे दुपारच्या वेळेत त्याला थोड्याशा विश्रांतीची आवश्यकता असते ती घेऊन पुन्हा कामाला निघून अंधार पडेपर्यंत लोक घरी येतात.
पूर्वीपेक्षा आता सोयी झाल्या असल्या तरीही मुळात इथल्या वस्तीची रचना थोडी दुरदूरवर अशी आहे. म्हणजे वाडी असली तरी भिंतीला भिंत लागून घरं नसतात. यात काही घरात तर म्हातारी कोतारी लोक एकटी सुद्धा रहातात.
त्यामुळे हरेक ठिकाणी/ गावात चहापाण्याची सोय सुद्धा असेलच अस सांगता येत नाही. खेडोपाडी चहाच्या टपऱ्या असायची इथे पद्धत आणि सवय दोन्ही नाही.
हल्लीहल्ली किरकोळ टपऱ्या दिसायला लागल्या आहेत काही काही ठिकाणी पण सरसकट नाहीच. सरकारी उपेक्षा आणि इथल्या तरुण वर्गाचं शहराच आकर्षण आणि कामधंद्याआभावी शहराकडे होणारं स्थलांतर यामुळे इथला विकास अजूनही प्राथमिक स्तरावरच आहे.
तरीही पर्यटक म्हणून आलेल्या माणसांना स्थानिक ज्या काही सोयी उपलब्ध करून देता येतील त्या करून देतातच. थोडक्यात मदतीला कोणी नाही म्हणत नाही शक्यतोवर.
अगदी स्वतःच्या मस्तीने दारू पिऊन समुद्रात गाड्या घालणाऱ्या लोकांच्या गाड्या वाळूत रुतल्या की त्या बाहेर काढायला सुद्धा मदतीला स्थानिकच येत असतात.
स्थानिक आधीच घसा खरवडून कल्पना देत असतानाही त्यांना अक्कल नाही आणि आपणच हुशार अस समजून लोक गाड्या पाण्यात घालतात.स्वतः मुलाबाळांना घेऊन खोल पाण्यात मस्ती करत शिरतात आणि धोका झाला की, मात्र स्थानिकांच्या नावाने ओरड घालत वाचवायला सांगतात.
या सगळ्यात स्थानिक लोक मदतीला कधीच नाही म्हणत नाहीत. हातातली काम धंदे टाकून वेळेला धावतात पण यात सुद्धा एक गंमत आहे. या गाड्या बाहेर काढण्यासाठी बोलवलेल्या जेसीपी वाल्याला पैसे द्यावे लागले की, मात्र लोकांकडे माणुसकी नाही अशी परत ओरड सुरू होते.
म्हणजे यांच्या मस्तीमुळे ओढवलेल्या परिस्थितीतून यांना बाहेरसुद्धा स्थानिकांनीच काढायच आणि त्या बदल्यात मोबदला सोडाच पण जेसीपीच्या भाड्याचे पैसे पण मागायचे नाहीत अशी अपेक्षा.
सकाळी दहा दहा वाजता उठून किंवा दहा अकरा वाजेपर्यंत समुद्रात डुंबत बसून कधीतरी बारा वाजता परत आल्यावर राहत असलेल्या होमस्टे वाल्याने जेवणाची वेळ झाल्यामुळे नाश्ता दिला नाही तरी त्याच्या नावाने खडे फोडायचे.
चहा जेवढ्या वेळात तयार होतो तेवढ्याच वेळात ऑर्डर दिल्यानंतर जेवण मिळायला हवं. मोदक, आंबोळी, शेवया, मासे यासारखे पदार्थ तोंडातून शब्द काढल्या काढल्या हजर व्हायला हवेत अशा अपेक्षा ठेवायच्या.
पिकतं तिथे विकत नाही या उक्तीनुसार इथल्या लोकांना या पदार्थांना विकत आणून खाण्याइतकं काही कौतुक नसल्यामुळे किंवा घरोघरी हे पदार्थ घरीच करून खायची सवय असल्यामुळे हॉटेल्समध्ये त्या प्रमाणात खप नसल्यामुळे हे पदार्थ नेहमी तयार नसतात.
त्यामुळे ऑर्डर आल्यावर ते तयार करून द्यायला थोडा वेळ लागू शकतो किंवा त्यासाठी आधीच ऑर्डर देऊन ठेवावी लागते जेणेकरून ज्या वेळी ते हवे असतील त्यावेळी ते उपलब्ध होतील पण ही वस्तुस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न कोणीच करत नाही.
उलट “अरे तुमच्याकडे पर्यटक येतात तुम्ही हे सगळं विक्रीसाठी तयार ठेवलं पाहिजे” असे सल्लेच जास्त मिळणार.
जीवापाड जपत, कष्ट करून राखलेल्या रस्त्याकडेच्या कलमांवर धरलेले आंबे जसे असतील तसे कच्चे पक्के येता जाता गाड्या थांबवून ओरबाडले तरीही स्थानिकांनी मात्र त्यावर काही न बोलता पर्यटकांचा तो हक्क असल्यासारख त्यांना वागू द्यायचं.
निसर्गसौंदर्याने नटलेल्या या प्रदेशात दारू पिऊन धिंगाणा घालून दारूच्या बाटल्या जागोजागी अक्षरशः चुरा करून टाकून ठेवल्या तरीही शांत रहायचं.
आजूबाजूच्या वाहनांची, लोकांची पर्वा न करता बेदरकारपणे गाड्या पळवायच्या. याशिवाय हॉटेल्समध्ये होणारी दादागिरी, चोऱ्या याबद्दल सुद्धा मौनच बाळगायचं कारण “अतिथी देवो भव” हा आपला संस्काराचा भाग आहे. भले आलेल्या अतिथीनि काहीही केलं तरी चालेल.
या आणि अशा अनेक अनुभवांमुळे आता स्थानिक लोक सुद्धा पूर्वीसारखे सरसकट मदतीला उभे राहत नाहीत पण योग्य गरज ओळखून मात्र नक्की मदत करतात.
इथे एखाद्या लहान मुलाला दूध, पेज किंवा तत्सम काही हवं असेल तर सांगितल्यावर एखादी माऊली नक्कीच त्याची सोय करून देईलच.
एखाद्या स्त्रीला मदतीची गरज असेल तर त्यासाठी इथला कोणीही मनुष्य उभा राहीलच. पण हातातली काम सोडून पूर्वीसारखं आलेल्यांच्या मागे फुकट पळत राहण्यात शहाणपणा नाही हे इथल्या माणसाला पूर्ण समजून चुकलेलं आहे.
भले तो पर्यटक असो किंवा घरी आलेला पाहुणा. आपल्या कामांचा खोळंबा करून लोकांच्या मागे पळत बसणारा कोकणी नक्कीच मागे पडत चालला आहे आणि त्यात मला तरी काहीही चुकीचं वाटत नाही.
शेवटी स्थळ काळ आणि अनुभव परत्वे या गोष्टी बदलत जाणारच. त्यामुळे येणाऱ्या लोकांनीही योग्य ती काळजी घेतली तर मात्र त्यांना या निसर्गरम्य कोकणाचा मनमुराद आनंद घेता येईलच.
– उत्तरा जोशी, देवगड (सिंधुदुर्ग)
टीप – कुठलाही नवा वाद निर्माण व्हावा या हेतूने ही पोस्ट केलेली नसून अनेकांचे असलेले अनेक गैरसमज दूर करण्याचा हेतूच यामागे आहे.