रत्नागिरी : जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील पालगड येथे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानांतर्गत आदिवासी समाजासाठी बालविवाह प्रतिबंधाबाबत विशेष जनजागृती कार्यक्रम साने गुरुजी कलामंदिर सभागृहात पार पडला.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आदिवासी समाजात बालविवाहाच्या दुष्परिणामांबाबत जागृती निर्माण करून ही अनिष्ट प्रथा पूर्णपणे रोखणे हा होता.
या कार्यक्रमात उपस्थितांना बालविवाह प्रतिबंधक कायदा, पोक्सो कायदा आणि कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करणाऱ्या कायद्यांविषयी सखोल माहिती देण्यात आली.

बालविवाहामुळे मुलींच्या शिक्षणावर, आरोग्यावर आणि त्यांच्या भविष्यावर होणाऱ्या गंभीर परिणामांबाबत प्रबोधन करण्यात आले. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदतीसाठी चाइल्ड हेल्पलाइन १०९८ आणि महिला हेल्पलाइन १८१ या क्रमांकांचा वापर करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
तसेच, जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि महिला व बालकांसाठी असलेल्या शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आली.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व नागरिकांनी बालविवाह करणार नाही व बालविवाह होऊ देणार नाही, अशी सामुदायिक प्रतिज्ञा घेऊन बालहक्क संरक्षणाचा निर्धार व्यक्त केला.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनोज पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी जिल्हा संरक्षण अधिकारी लहू पगडे, संरक्षण अधिकारी माणिक कांबळे, संस्थात्मक संरक्षण अधिकारी अनिल गायकवाड, चाइल्ड हेल्पलाइन प्रकल्प समन्वयक अन्वी शिंदे, समुपदेशक ओंकार जाधव, महाराष्ट्र आदिवासी कातकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष विठोबा जगताप आणि तालुका सल्लागार कृष्णा हिलम उपस्थित होते.
या उपक्रमाच्या माध्यमातून आदिवासी समाजात बालहक्क आणि महिला सक्षमीकरणाचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.


Leave a Reply