शनिवार, १४ नोव्हेंबर २०२६ f ◎ 𝕏 ▶

चिपळूणमध्ये १६ आणि १७ जानेवारीला रंगणार ‘कोकण लोककला महोत्सव २०२७’

चिपळूणमध्ये १६ आणि १७ जानेवारीला रंगणार ‘कोकण लोककला महोत्सव २०२७’

Chiplun : कोकणच्या समृद्ध लोककला, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वैभवाला हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी एक्सप्लोर कोकण, कोकण रिपोर्टर आणि व्हिजन थ्री न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने १६ आणि १७ जानेवारी २०२७ रोजी चिपळूण येथे ‘कोकण लोककला महोत्सव २०२७’ चे आयोजन करण्यात आले आहे.

शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात हा दोन दिवसीय भव्य सोहळा मोठ्या उत्साहात पार पडेल, अशी माहिती आयोजक सतीश कदम, मकरंद भागवत आणि राजेंद्रकुमार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आधुनिकतेच्या प्रवाहात पारंपरिक लोककला मागे पडू नयेत आणि नव्या पिढीला आपल्या सांस्कृतिक मुळांची ओळख व्हावी, या मुख्य उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवासाठी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाचही जिल्ह्यांतील मंत्री, खासदार, आमदार, प्रशासकीय अधिकारी, उद्योजक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे.

या दोन दिवसीय महोत्सवात कोकणच्या मातीत रुजलेल्या दशावतार, पालखी सोहळ्यातील पारंपरिक नृत्य, नकटा, संकासूर, जाखडी, कोळी नृत्य, चपई नृत्य, काटखेळे, वारली नृत्य, धनगरी गजा नृत्य आणि कातकरी नृत्य अशा अनेक वैविध्यपूर्ण लोककलांचे सादरीकरण होणार आहे.

या महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे प्रसिद्ध तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडाबाबा हे स्वतः उपस्थित राहून तारपा वाद्याचे सादरीकरण करणार असून त्यांचा यथोचित सन्मानही करण्यात येणार आहे.

याशिवाय स्थानिक कलाकारांच्या पारंपरिक कलाप्रकारांनाही या महोत्सवातून मोठी संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

हा महोत्सव केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता कोकणच्या लोकसंस्कृतीचे जतन, संवर्धन आणि नव्या पिढीकडे तिचे हस्तांतरण करण्याचे एक महत्त्वपूर्ण माध्यम ठरणार आहे. या सोहळ्यात लोककलेच्या क्षेत्रात आयुष्यभर योगदान देणाऱ्या ज्येष्ठ लोककलावंतांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे.

कोकणची लोककला ही येथील लोकजीवन, श्रद्धा आणि सामाजिक संस्कृतीचे प्रतिबिंब आहे. त्यामुळे हा केवळ दोन दिवसांचा कार्यक्रम नसून तो कोकणच्या मातीचा, परंपरेचा आणि कलावंतांच्या सांस्कृतिक स्वाभिमानाचा मोठा उत्सव ठरेल, असा विश्वास सतीश कदम, मकरंद भागवत आणि राजेंद्रकुमार शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

Chiplun News, Explore Konkan, Indira Gandhi Sanskrutik Kendra, Konkan Folk Art Festival, Konkan Lokakala Mahotsav 2027, Maharashtra Cultural Events, Traditional Art Maharashtra

माय कोकण टीम

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *