रविवार, २९ नोव्हेंबर २०२६ f ◎ 𝕏 ▶

दापोलीत जेसीआयच्यावतीने सहा महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान

दापोलीत जेसीआयच्यावतीने सहा महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान

दापोली : येथील आनंद फाऊंडेशन संचलित बहुविकलांग व गतिमंद मुलांचे पुनर्वसन व शिक्षण केंद्र, जालगाव येथे बहुविकलांग व गतिमंद मुलांच्या शिक्षण, संगोपन आणि पुनर्वसनासाठी आपले आयुष्य समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या सहा महिला कर्मचाऱ्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जेसीआय दापोलीच्या वतीने ‘Salute the Silent Stars’ हा उपक्रम राबविण्यात आला. १५ सप्टेंबर रोजी जेसीआय सप्ताहाच्या ग्रँड फिनालेनिमित्त हा विशेष कार्यक्रम पार पडला.

बहुविकलांग मुलांचे शिक्षण, संगोपन, दैनंदिन गरजा आणि त्यांची काळजी घेणे हे अत्यंत संयम, संवेदनशीलता आणि समर्पणाची गरज असलेले कार्य असून, माहेश्वरी विचारे, संगीता गुहागरकर , मनिषा पालव , श्रावणी गोवले , ऋतुजा उजाळ आणि सानिका भुवड या सहाही महिला अत्यंत ममत्वाने आणि निष्ठेने ही जबाबदारी पार पाडत आहेत.

विशेष म्हणजे गणेशोत्सव, दिवाळी तसेच उन्हाळी सुट्टीच्या काळात अनेक मुलांना पालक घरी घेऊन जाऊ शकत नाहीत, अशा वेळी या महिला स्वतःच्या कुटुंबापासून दूर राहून केंद्रातील मुलांसोबतच राहतात आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता त्यांची काळजी घेतात.

या विशेष मुलांच्या चेहऱ्यावर उमटणारे हास्य हीच त्यांच्या सेवाभावाची खरी पावती असून, त्यांच्या या निस्वार्थ कार्याला समाजाकडून अधिक कौतुक आणि प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे.

विविध शासकीय व सार्वजनिक संस्थांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांचा सामाजिक संस्थांकडून वेळोवेळी गौरव केला जातो, मात्र अशा विशेष मुलांच्या सेवेत प्रत्यक्ष झोकून देऊन कार्य करणाऱ्या व्यक्तींचे योगदान अनेकदा व्यापक समाजाच्या लक्षात येत नाही, याच भावनेतून जेसीआय दापोलीने या सहा महिलांच्या कार्याची दखल घेतली.

हा कोणताही औपचारिक सत्कार सोहळा नसून त्यांच्या अमूल्य आणि निस्वार्थ कार्याप्रती कृतज्ञता व आदर व्यक्त करण्याचा एक छोटासा प्रयत्न असल्याचे जेसीआय दापोलीच्या वतीने सांगण्यात आले असून, यावेळी सहाही महिलांना कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून भेटवस्तू देण्यात आल्या.

या सोहळ्यासाठी जेसीआय दापोलीचे अध्यक्ष कुणाल मेहता, सचिव रोशन वेदक, जेसीआय सप्ताह समन्वयक तेजस मेहता, प्रकल्प संचालक कुणाल मंडलीक, प्रकल्प समन्वयक विनय शिगवण, भूषण इस्वलकर, ऋषिकेश शेठ, मयुरेश शेठ, प्रसाद दाभोळे, अद्नान मुकादम, रोहन आंब्रे आणि ऋषिकेश तलाठी उपस्थित होते. जेसीआय सप्ताहाचा समारोप अशा सेवाभावी कार्याला मानवंदना देत झाल्याने ‘Salute the Silent Stars’ हा उपक्रम माणुसकी, संवेदनशीलता आणि कृतज्ञतेचा सुंदर संदेश देणारा ठरला.

Anand Foundation, dapoli news, Dr Kunal Mehta, jci dapoli, Salute the Silent Stars, Social Service Dapoli, Special Children Welfare

Updated: 18 Sep 2026 11:02 AM

माय कोकण टीम

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *