पोलीसांना ही माहिती कळवा अन्यथा येऊ शकता अडचणीत

रत्नागिरी : जिल्ह्याला २३७ कि. मी. लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. आंबा व मासेमारी हा व्यवसाय प्रामुख्याने येथे केला जातो तसेच रत्नागिरी, चिपळूण व खेड येथे औद्योगिक वसाहती देखील आहेत.

आंबा व मासेमारी व्यवसाय करणारे तसेच बांधकाम क्षेत्रामध्ये कामानिमित्त मोठ्या प्रमाणात इतर जिल्ह्यातून, राज्यातून तसेच इतर देशातून देखील कामगार वर्ग येत असतो.

औद्योगिक वसाहती असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात परप्रांतीय नागरिक हे नोकरी, व्यवसाय व इतर कामानिमित्त रत्नागिरी मध्ये येऊन भाड्याने घरे, दुकान गाळे, फ्लॅट किंवा फार्म हाऊस घेऊन राहतात.

परंतु, याबाबतची माहिती घर मालकांकडून स्थानिक पोलीस ठाण्याला देण्यात येत नसल्याचे दिसून आलेले आहे.

दहशतवादी कारवाया व गुन्हेगारी पार्श्वभूमीवर एखादा गुन्हा घडल्यावर त्याची तात्काळ उकल होण्यासाठी घर मालकांनी आपले घर भाड्याने देताना भाडेकरूंची संपूर्ण माहिती पोलीस ठाण्याला देणे अत्यंत आवश्यक असते जेणेकरून दहशतवादी व गुन्हेगारी कारवाया आटोक्यात आणण्यासाठी मदत होईल.

जिल्ह्यातील नगरपालिका, ग्रामपंचायत इत्यादी हद्दीमध्ये राहणारे मालमत्ता धारक यांनी त्यांच्याकडील घरे, दुकान-गाळे, फ्लॅट किंवा फार्म हाऊस इ. प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष रित्या भाडे तत्वावर देणे, पोट भाडेकरू ठेवणे किंवा विक्री केल्यास विकत घेणाऱ्यांची व भाडेकरूंची संपूर्ण माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात ७ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे.

याकरिता रत्नागिरी जिल्ह्यातील घर मालकांनी त्यांच्या घरात भाडेकरू ठेवताना भाडेकरूंचे संपूर्ण नाव, सध्याचा पत्ता, मूळ पत्ता, दोन फोटो व त्यांना ओळखणाऱ्या व्यक्तीचे नाव व पत्ता, घरभाडे करारनामा, ओळखपत्र इत्यादी कागदपत्रे प्राप्त करून स्थानिक पोलीस ठाण्याकडे सादर करणे बंधनकारक आहे.

भाडेकरुंची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यास न दिल्यास भारतीय दंड विधान संहिता चे कलम १८८ अन्वये दंडनीय कारवाईस पात्र राहतील, असा आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी यांनी पारित केला आहे. हा आदेश हा आदेशाच्या दिनांकापासून दोन महिन्यांसाठी अंमलात राहील.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*