दापोली : दापोली क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अभिनव शालेय लेदर बॉल क्रिकेट लीग स्पर्धेचे शानदार उद्घाटन २६ नोव्हेंबर रोजी जालगावचे सरपंच अक्षय फाटक यांच्या हस्ते पार पडले.
दापोलीच्या क्रीडा विश्वात अशा प्रकारच्या शालेय लीग स्पर्धेचे आयोजन प्रथमच करण्यात आले असून, या उपक्रमाला क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

आजची युवा पिढी मोबाईलच्या विळख्यातून बाहेर पडून मैदानाकडे वळावी आणि त्यातून दापोलीचे नवे प्रतिभावान खेळाडू निर्माण व्हावेत, या उद्देशाने मंडळाचे खजिनदार जतीन साळगावकर यांनी या स्पर्धेची संकल्पना मांडली होती.
त्यांच्या या संकल्पनेला आज मूर्त रूप आले असून, पुढील तीन दिवस या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संघांना आणि खेळाडूंना अनेक आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे.

या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी दापोली क्रीडा मंडळाचे अध्यक्ष राजेश घोसाळकर, सचिव शेखर आग्रे, खजिनदार जतीन साळगावकर, प्रशिक्षक मनोज बागकर यांच्यासह अमित बिंद, नवाज फकी, मकबुल बरोंडकर, श्रेयस खटावकर, कौस्तुभ वंडकर, मंगेश घाणेकर, आशिष घाणेकर, संस्कार बिंद, रितेश गुजर, सुरज खेडेकर, शोएब सहिबोले, श्रेयस मेहंदळे, महेंद्र शिंदे, समीर झगडे, सचिन मुरुडकर, स्वप्नील शिंदे, अमित इंदुलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply