रत्नागिरी : राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्र. १’ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात आली असून, यामध्ये रत्नागिरीतील परशुराम प्रभाकर ढेकणे उर्फ दादा ढेकणे यांना स्थान देण्यात आले आहे. महसूल विभागाने १९ नोव्हेंबर २०२६ रोजी याबाबतचा अधिकृत शासन निर्णय जारी केला आहे.
हे अभियान अधिक प्रभावी, लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान करण्यासाठी राज्यभरातून एकूण दहा अशासकीय सदस्यांची निवड शासनाने केली आहे. यामध्ये रत्नागिरीच्या तेली आळी येथील परशुराम उर्फ दादा ढेकणे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील महसूल विषयक प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि शिबिरांच्या यशस्वी आयोजनासाठी मोठी मदत होणार आहे.
या शासन निर्णयानुसार नियुक्त करण्यात आलेल्या सदस्यांची कार्यकक्षा निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय समिती सदस्यांशी समन्वय साधणे, तसेच विभागातील शिबिरांचे नियोजन आणि आयोजनाबाबत राज्य समन्वयकांना वेळोवेळी अवगत करणे यांचा समावेश आहे.
याशिवाय राज्य समन्वयक, समिती सदस्य आणि जिल्ह्याचे प्रभारी यांच्या निर्देशानुसार कार्यवाही करणे, तसेच स्थानिक खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य ते सरपंच यांच्याशी संपर्क साधून त्यांचा अभियानातील सहभाग निश्चित करणे ही जबाबदारी या सदस्यांवर असेल. अभियानाच्या अधिक यशस्वी अंमलबजावणीसाठी शासनाला आवश्यक सूचना करण्याचे अधिकारही त्यांना देण्यात आले आहेत.
परशुराम उर्फ दादा ढेकणे यांच्यासह या यादीत नांदेडचे संजय कौडगे, लातूरचे अरविंद पाटील निलंगेकर, यवतमाळचे नितीनकुमार भुतडा, वर्ध्याचे संजय गाते, पुण्याचे वासुदेव काळे व जगदीश मुळीक, पालघरचे प्रकाश निकम, धुळ्याचे बबनराव चौधरी आणि अहिल्यानगरचे भानुदास बेरड यांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महसूल विभागाचे कार्यासन अधिकारी सोमानंद ढमढेरे यांनी राज्यपालांच्या आदेशानुसार हा शासन निर्णय निर्गमित केला आहे.

Leave a Reply