मंगळवार, २४ नोव्हेंबर २०२६ f ◎ 𝕏 ▶

दापोलीत नारळ काढताना विजेचा धक्का बसून उंबर्लेच्या पोलीस पाटलाचा मृत्यू

दापोलीत नारळ काढताना विजेचा धक्का बसून उंबर्लेच्या पोलीस पाटलाचा मृत्यू

दापोली : नारळाच्या झाडावरून नारळ काढत असताना महावितरणच्या मुख्य विद्युतवाहक तारेचा स्पर्श होऊन विजेचा तीव्र धक्का बसल्याने उंबर्ले गावचे पोलीस पाटील संतोष बाळू नाचरे (वय ५०, रा. उंबर्ले गाववाडी, ता. दापोली) यांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रविवार, २२ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष नाचरे हे वडील बाळू गोविंद नाचरे यांच्या घराशेजारील झाडावरून नारळ काढत होते. बाळू नाचरे यांनी झाडाला लावलेली लोखंडी शिडी खाली धरली होती, तर संतोष शिडीवर चढून लोखंडी पानकाप्याने नारळ काढण्याचे काम करत होते.

याच दरम्यान शिडीवरून त्यांचा अचानक तोल गेला. स्वतःला सावरण्याच्या प्रयत्नात त्यांच्या हातातील लोखंडी पानकापा झाडाजवळून जाणाऱ्या महावितरणच्या खांबावरील मुख्य विद्युतवाहक तारेला चिकटला. यामुळे संतोष यांना विजेचा जोरदार धक्का बसला आणि ते थेट जमिनीवर कोसळले.

मुलगा बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर पडल्याचे पाहून वडिलांनी आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून गावातील अजय सणस, प्रतिक जाधव आणि इतर ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

संतोष यांच्या शरीरात कोणतीही हालचाल जाणवत नसल्याने ग्रामस्थांनी त्यांना तत्काळ रिक्षाने दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना सायंकाळी सहा वाजता मृत घोषित केले.

कर्तव्यदक्ष पोलीस पाटलाच्या अशा अपघाती निधनाने उंबर्ले गावासह परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची (क्रमांक ९२/२०२६) नोंद करण्यात आली असून, पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

accidental death, dapoli news, Dapoli police, Electrocution Accident, Maharashtra News, MSEDCL, Police Patil Death, ratnagiri news, Umbarle Village

माय कोकण टीम

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *