दापोली : तालुक्यातील हर्णे येथील युनियन बँक ऑफ इंडिया शाखेच्या भोंगळ आणि धीम्या कारभारामुळे बँक ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे समोर आले आहे.
हर्णे येथील रहिवासी तन्मय खळे या ग्राहकाने यासंदर्भात तीव्र संताप व्यक्त केला असून बँकेतील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणावर बोट ठेवले आहे.
खळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना मोठ्या रकमेची आवश्यकता असल्याने त्यांनी नियमानुसार एक दिवस आधीच बँक प्रशासनाला उद्या रोख रक्कम लागणार असल्याचे कळविले होते.
मात्र, दुसऱ्या दिवशी बँकेत गेल्यानंतर कॅशियरने रोख रक्कम उपलब्ध नसल्याचे सांगत त्यांना दुपारी तीन वाजेपर्यंत थांबण्यास भाग पाडले.
बँकेत कोणत्याही एका साध्या कामासाठी गेल्यास ग्राहकांना तब्बल पाच-पाच वेळा फेऱ्या माराव्या लागतात, असा थेट आरोप खळे यांनी केला आहे.
बँक कर्मचारी ग्राहकांची कामे वेळेवर न करता वेगवेगळ्या प्रकारची कारणे सांगून त्यांना ताटकळत ठेवतात, ज्यामुळे सामान्य नागरिकांचा मौल्यवान वेळ आणि पैसा वाया जात आहे.
युनियन बँकेच्या या ढिसाळ कारभारामुळे हरणाई परिसरातील बँक ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या शाखेच्या कारभारात सुधारणा करावी अशी मागणी केली जात आहे.

