लांजा: मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा शहराच्या हद्दीत बुधवारी सकाळी एक अत्यंत थरारक आणि भीषण अपघात घडला. लांजा येथील शांतीनगर आणि रेस्ट हाऊस परिसराजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका डंपरला भरधाव कारने पाठीमागून जोरदार धडक दिली.
या भीषण दुर्घटनेत दोन महिला आणि एका पुरुषासह एकूण चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरू केले.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावरून गोव्याच्या दिशेने मुंबईकडे एक क्रेटा कार (क्रमांक MH 01 CP 8021) येत होती. बुधवार सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही कार लांजा रेस्ट हाऊस परिसराजवळ आली असता, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या डंपरवर (क्रमांक MH 05 EL 3877) जाऊन आदळली.
हा अपघात इतका भीषण होता की, धडक बसताच कारचा समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला आणि कार डंपरच्या खाली घुसली. आवाजामुळे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली आणि कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले.

या अपघातामध्ये कारमधील चार प्रवाशांचा तीव्र मार लागल्यामुळे जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने कारचे पत्रे कापून मृतदेह आणि जखमींना बाहेर काढले. जखमींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने जवळच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी हलवण्यात आले असून, पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्याची तयारी सुरू आहे.

पोलिसांनी घटनास्थळाचा रीतसर पंचनामा केला असून, दोन्ही वाहने रस्त्यावरून बाजूला करून वाहतूक कोंडी सोडवली आहे. महामार्गावर उभ्या राहणाऱ्या जड वाहनांमुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

