दापोली : तालुक्यातील आंजर्ले तरीबंदर येथील ग्रामपंचायतीजवळ पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या बोटींना रात्रीच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या आगीत दोन बोटी जळून खाक झाल्या असून मच्छीमारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

आग लागल्याचे समजताच स्थानिक नागरिकांनी आणि मच्छीमारांनी तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. त्यांनी जेसीबीच्या साहाय्याने शेजारी उभ्या असलेल्या इतर बोटी बाजूला केल्या, ज्यामुळे आग अधिक पसरली नाही आणि एक मोठी दुर्घटना टळली.

या घटनेची माहिती मिळताच खेड येथून अग्निशमन दलाच्या गाडीला पाचारण करण्यात आले, मात्र नेहमीप्रमाणे खेडहून गाडी येईपर्यंत स्थानिक नागरिकांनी स्वतःच्या शर्थीच्या प्रयत्नांनी आग मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आणली होती. खेड येथील अग्निशमन दल पोहोचेपर्यंत आगीत दोन बोटी पूर्णपणे खाक झाल्या होत्या.

या घटनेमुळे दापोली तालुक्यात स्वतंत्र आणि सुसज्ज अग्निशमन यंत्रणेची असलेली आवश्यकता पुन्हा एकदा प्रकर्षाने अधोरेखित झाली आहे.

दापोली हा पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा तालुका असून येथे मोठी मच्छीमारी बंदरे, शेकडो पर्यटनस्थळे, हॉटेल्स आणि सातत्याने वाढणारी लोकवस्ती आहे.

अशा संवेदनशील आणि गजबजलेल्या भागात कोणत्याही आपत्कालीन घटनेसाठी दापोलीला नेहमी खेड येथील अग्निशमन दलावर अवलंबून राहावे लागते.

खेडवरून गाडी येईपर्यंतचा वेळ दुर्घटनाग्रस्तांसाठी अत्यंत घातक ठरू शकतो, हे या घटनेतून पुन्हा सिद्ध झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने पाहावे आणि दापोली तालुक्यासाठी तातडीने आधुनिक अग्निशमन केंद्र व अग्निशमन बंब उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आता स्थानिक नागरिकांमधून अत्यंत तीव्रतेने केली जात आहे.