रत्नागिरी- इंग्लंडमध्ये निर्यात केल्या जाणार्‍या वस्तूंवरील बंधने शिथिल करण्यात आली असून त्यात हापूसवरील उष्णजल प्रक्रियेचा समावेश आहे.त्याचा फायदा निर्यातवाढीला होणार असून कोकणातील हापूसच्या निर्यातीत 30 ते 40 टक्के वाढ होईल,अशी आशा आहे.हा कोकणातील बागायदारांना दिलासा आहे.तसेच येत्या चार दिवसात रत्नागिरीतून पहिली शिपमेंट इंग्लंडला रवाना होणार आहे. देशभरातून दरवर्षी विविध प्रकारच्या आंब्याची 50 हजार मेट्रिक टन एवढी निर्यात वेगवेगळ्या देशांमध्ये केली जाते.यामध्ये इंग्लंडला होणार्‍या 3 ते 4 हजार मेट्रिक टन निर्यातीत कोकणातील हापूस20 टक्के आहे. दरवर्षी सरासरी 600 मेट्रिक टन हापूस इंग्लंडमध्ये जातो.युरोपियन देशांसाठी उष्णजल प्रक्रिया आवश्यक होती.फळमाशीवर नियंत्रणासाठी 48 अंश सेल्सिअस तापमानाला 60 मिनिटे फळ पाण्यात ठेवून ही प्रक्रिया होते त्यासाठी लासलगाव आणि वाशीसह रत्नागिरीतील पॅकहाउसमध्ये सुविधा आहे.युरोपियन देशांच्या समुहातून इंग्लंड बाहेर पडल्यानंतर विविध वस्तूंच्या निर्यातीवर यंदा शिथिलता आणली गेली.त्यानुसार भारतामधून निर्यात होणार्‍या 16 वस्तूंचा समावेश आहे.याचा फायदा भारतामधून निर्यात होणार्‍या आंब्यासह हापूसला होणार आहे. उष्णजल प्रक्रियेमुळे पातळ साल असलेल्या हापूसचा दर्जा घसरत होता.यावर पणनने अभ्यास करून निकष बदलाची मागणी केली होती. त्यावर निर्णय झालेला नाही.परंतु इंग्लंडने निर्बंधात दिलेल्या शिथिलतेचा फायदा अनेक बागायतदारांना होणार आहे;मात्र आंब्याचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी शासनाकडून प्रोटोकॉल निश्‍चित करण्याची मागणी व्यवसायिकांकडून होत आहे.