मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हिंदूस्थान कोकाकोला ब्रेवरेज कंपनीचे भुमीपुजन आणि रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा शुभांरभ उद्या होत आहे.

उद्योगमंत्री पदाची आणि पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर रत्नागिरीचे भूमिपुत्र असणारे पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हावासियांना दिलेल्या शब्दाची स्वप्नपूर्ती साक्षात उद्या होत आहे.

त्याशिवाय तब्बल 6 लाख 98 हजार 584 स्वेअर मीटर भूखंड एमआयडीसीच्या माध्यमातून वाटप करुन 3 हजार 55 कोटी 33 लाखांची गुंतवणूक जिल्ह्यात येऊ घातलेली आहे.

उद्योगमंत्र्यांच्या या उद्योग भरारीवर आणि स्वप्नपूर्तीवर त्यांची घेतलेली मुलाखत..

प्रश्न : सर नमस्कार.. उद्योग मंत्री झाल्यानंतर जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी आपल्याला मिळाली. या दोन्ही पदांचा जिल्ह्यासाठी कसा लाभ झाला?

उदय सामंत : 15 महिन्यापूर्वी उद्योग विभागाचा कार्यभार घेतला आणि जिल्ह्यातील उद्योग वाढीसाठी मी, शब्द दिला होता.

मला सांगायला आज अभिमान वाटेल, कोकाकोलाचा प्रकल्प आपल्या जिल्ह्यातून बाहेर चालला होता. मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून तो थांबला आणि त्याचे भूमिपुजन आता होत आहे. कोकाकोलाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन पॅब्लो रॉड्रीग्ज हे राज्यात प्रथमच येत आहेत.

या एका कंपनीमुळे जिल्ह्यात 2500 कोटींची गुंतवणूक होत असून जवळपास साडेतीन हजार रोजगार निर्मिती होणार आहे. भारतीय शिपयार्ड ही पुन्हा दाभोळ आणि रत्नागिरी येथे सुरुवात झाली आहे. यामधून 2 हजार रोजगार निर्मिती होणार आहे.

प्रश्न : सर, एकूणच एमआयडीसी च्या माध्यमातून जिल्ह्यात आपण उद्योग मंत्री झाल्यानंतर किती भूखंडाचे वाटप झाले?

उदय सामंत : 1 ऑक्टोबर 2022 ते आज अखेर 6 लाख 98 हजार 584 स्केअर मीटर भूखंड वाटप करण्यात आले आहे.

यामध्ये 3 हजार 55 कोटी 33 लाखांची गुंतवणूक प्रगतीपथावर आहे. या गुंतवणुकीमधून 5 हजार रोजगार निर्मिती अपेक्षित आहे.

प्रश्न : जिल्ह्यातील पर्यटन आणि एकूणच आंबा काजू उत्पादक विचारात घेऊन त्याबाबत आपण काही प्रस्तावित प्रकल्प केले आहेत का?

उदय सामंत : रत्नागिरी हा पर्यटन जिल्हा आहे. इथले सागर किनारे, निसर्ग सौंदर्य हे नेहमीच पर्यटकांना भूरळ घालतात. आंबा हे इथलं प्रमूख पीक आहे.

त्यासाठी रत्नागिरी निवेंडी येथे मँगो कॅशो पार्क उभारण्यात येणार आहे. त्याबाबतचा मसुदा प्रसिध्दही झाला असून यामधून 5 हजार रोजगार निर्मिती होणार आहे.

दापोली तालुक्यातील हर्णे येथे मेगा ॲक्वा मरीन पार्क उभारणीकरिता गुंतवणुकीस चालना मिळण्याच्या दृष्टीने महामंडळातर्फे नेमलेल्या मे. ग्रँड थॉर्नटॉन या सल्लागार संस्थेमार्फत मसुदा प्रसिध्द करण्यात आला आहे. यामधूनही मोठया प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे.

पर्यटनाच्या दृष्टीने म्हणाल तर रत्नदूर्ग येथे वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत शिवसृष्टी उभारण्यात येत आहे. स्थापत्य विषयक काम प्रगतीपथावर आहे. याच्या पूर्ततेनंतर सर जे जे स्कूल ऑफ ऑर्ट च्या माध्यमातून संकल्पना आणि निर्मिती विषयक काम हाती घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत तारांगण शेजारील शिर्के उद्यानाचे सुशोभिकरण करण्यात येत आहे. या ठिकाणी वारकऱ्यांचे श्रध्दास्थान असलेल्या अवघ्या महाराष्ट्राच्या विठु माऊलीची 21 फूट उंच मूर्ती साकारण्यात येत आहे.

तसेच जिजामाता उद्यान सुशोभिकरणांतर्गत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची 20 फुटी मूर्ती 30 फूट उंचीवर उभारण्यात येणार आहे. याचे स्थापत्य विषयक काम अंतिम टप्प्यात आहे.

वैशिष्ट्यपूर्ण योजनेतंर्गत थ्रीडी मॅपींग मल्टीमीडिया शोचे काम थिबा पॅलेस परिसरात प्रगतीपथावर आहे.

यासाठी 20 कोटी चा निधी दिला आहे. देशातील मोठया प्रमाणातील पर्यटकांना जिल्हयात हे सर्व आकर्षण ठरणार आहे.

प्रश्न : नमो 11 सुत्री कार्यक्रमातून उद्याच्या कार्यक्रमामध्ये नक्की काय प्रयोजन आहे.

उदय सामंत : देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून नमो 11 सुत्री कार्यक्रमाचा शुभांरभ राज्यात रत्नागिरी येथून होत आहे.

प्रशासनामार्फत जिल्ह्यात कार्यतत्परतेने राबविण्यात येत आहे. यामधून 2 हजार 443 समुदाय संसाधान व्यक्ती अर्थात सीआरपींना मोफत मोबाईल वाटप होणार आहे. त्याचबरोबर 2 हजार 41 कामगार कीट ते वाटप होणार आहे. नमो शेततळे अंतर्गत लाभार्थ्यांना मंजुरी पत्र देण्यात येणार आहे.

स्मार्ट शाळा अंतर्गत शाळांचे डिजीटल करण्यास सुरुवात झाले आहे. 23 दिव्यांग लाभार्थ्यांना उद्या प्रत्यक्षात लाभ देवून नमो दिव्यांग शक्ती अभियानाची सुरुवात होणार आहे.

गोळप येथे 8 कोटींचा नमो सौर ऊर्जा गाव अभियानाचे ऑनलाईन भूमिपूजन होणार आहे. त्याचबरोबर राजापूर, चिपळूण आणि जिल्हा क्रीडा संकुलाचे भूमिपूजनही ऑनलाईन होणार आहे.

राजापूर, लांजा, चिपळूण, गुहागर याठिकाणीही संविधान भवनाचे भूमिपूजन ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. संगमेश्वर येथील कर्णेश्वर मंदिराचे कामही हाती घेण्यात आले आहे.

प्रश्न : एकूणच आपल्या मंत्री पदाच्या कारकीर्दीत जिल्ह्यावर कोट्यावधी कामांच्या रत्नांची बरसात झालेली दिसते. त्याबद्दल आपले खूप खूप आभार, अभिनंदन आणि भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा..

उदय सामंत : माझ्या जिल्ह्याचा विकास म्हणजेच राज्याचा विकास पर्यायाने देशाचा विकास आहे.

मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मा.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मा.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मी राज्याच्या आणि जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबध्द आहे.

भविष्यात यापुढेही त्यादृष्टीने माझा प्रयत्न सुरु असणार आहे.

– प्रशांत सातपुते, जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी