दापोली : शहरातील कामगार गल्लीमध्ये काही महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेल्या खोक्यांना रविवारी दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्याने खळबळ उडाली. यामध्ये दोन खोके आगीत जळून खाक झाले असून सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार 16 रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास शहरातील कामगार गल्ली या परिसरात माकडांचा एक कळप आला. उड्या मारत असताना अचानक एका माकडाने इलेक्ट्रिक पोलवर उडी मारत मेन वायर तोडली आणि ती थेट एका खोक्यावर जाऊन पडली. यावेळी वीजपुरवठा सुरू असल्याने खोक्याने पेट घेतला. बघता बघता खोक्यातील शिलाई मशीन, वरलॉक मशिन व कपडे तसेच दुसऱ्या खोक्यातील रेडिमेट कपडे यांनी पेट घेतला. यामध्ये दोन्ही खोक्यातील साहित्य जळून खाक झाले असून यात सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले. हे दोन्ही गाळे रविवारी बंद असल्याने कुठलीही जीवित हानी झाली नाही. दरम्यान खोके व्यापारी संघटना यांनी जयवंत गोरीवले- रा. चंद्रनगर व संगीता नरवणकर-रा. लाडघर या दोन खोके धारकांना आर्थिक सहाय्य करण्याचे ठरवले आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अशोक कांबळे, अमोल पवार, जयवंत बोरजे, उत्तम कांबळे, राजेश पवार यांनी प्रयत्न केले.