रत्नागिरी: पावसाळा जवळ आल्याने पाणी साचणे, गटारे तुंबणे आणि दुर्गंधीचा त्रास टाळण्यासाठी प्रभाग क्रमांक १५ मध्ये गटार आणि नालेसफाई मोहिमेला सुरुवात झाली आहे.

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. त्या स्वतः उपस्थित राहून जेसीबीच्या साहाय्याने विविध भागांतील गटारे आणि नाले साफ करून घेत आहेत.

अनेक ठिकाणी गाळ, कचरा आणि झाडाझुडपांमुळे पाण्याचा प्रवाह अडला होता. पावसाचे पाणी सुरळीत वाहून जाण्यासाठी हा अडथळा तातडीने दूर करण्यात येत आहे.

या मोहिमेदरम्यान वर्षा ढेकणे यांनी नागरिकांशी संवाद साधून परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले. पावसाळ्यात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून प्रशासनाच्या माध्यमातून ही कामे वेळेत पूर्ण केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पावसाळ्यापूर्वी सुरू झालेल्या या साफसफाई मोहिमेमुळे पूरस्थिती आणि पाणी साचण्याच्या समस्येवर नियंत्रण मिळवणे सोपे होणार असल्याने नागरिकांनी या कामाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले आहे.