रत्नागिरी : शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मुस्लिमांनी ईद-उल-अजहा म्हणजेच बकरी ईद अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात साजरी केली. सकाळपासूनच सर्वत्र सणाचा मोठा उत्साह पाहायला मिळत होता.

सणाच्या निमित्ताने नवीन कपडे परिधान करून आबालवृद्ध सकाळीच घराबाहेर पडले होते.

या सणानिमित्त विशेष नमाज अदा करण्यासाठी रत्नागिरी शहरातील तसेच ग्रामीण भागातील विविध मशिदींमध्ये मोठी गर्दी उसळली होती.

काही ठिकाणी ईदगाह मैदानांवरही सामुदायिक नमाज पठण करण्यात आले. नमाज पठण पूर्ण झाल्यानंतर सर्वांनी एकमेकांची गळाभेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी शांतता, बंधुभाव आणि देशाच्या प्रगतीसाठी विशेष प्रार्थना करण्यात आली.

बकरी ईद हा बलिदानाचा आणि त्यागाचा संदेश देणारा सण मानला जातो. या सणाच्या दिवशी गोरगरिबांना मदत करण्याला आणि दानधर्माला विशेष महत्त्व असते.

नमाजनंतर लोकांनी आपल्या नातेवाईकांच्या आणि मित्रांच्या भेटीगाठी घेतल्या.

एकमेकांच्या घरी जाऊन शिरकुर्मा आणि इतर पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घेत आनंद द्विगुणित करण्यात आला.

दरम्यान, सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात आणि जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांतर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अत्यंत शांततेत आणि आनंदाच्या वातावरणात हा सण संपन्न झाला.