दापोली: अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ महाराष्ट्र राज्य शाखा दापोली यांच्या वतीने बुधवारी (२७ मे) जालगाव येथील श्री शैल मंगल कार्यालय येथे भजन कलावंत, भजनप्रेमी व रसिक यांच्यासाठी मार्गदर्शन व सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीचे संस्थापक अध्यक्ष भगवान लोकरे, राज्य सचिव प्रमोद हर्याण यांच्यासह विविध पदाधिकारी व मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात दापोली शाखेचे सचिव जीवन गुहागरकर यांच्या सूत्रसंचालनाने झाली. दीपप्रज्वलन करून गणपती, नटराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यानंतर मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. दापोली शाखेचे कार्याध्यक्ष गजानन बेलोसे यांनी प्रास्ताविकातून संघटनेची स्थापना, उद्दिष्टे आणि भजन कलावंतांना मिळणारे मार्गदर्शन याविषयी माहिती दिली.

या सभेत गुहागर तालुका प्रमुख सागर मोरे, लांजा तालुका अध्यक्ष संजय राऊत, रायगड जिल्हा सचिव सागर राऊत, कीर्तनकार देशमुख, पंचायत समिती सदस्य श्रीराम इदाते, जिल्हा परिषद सदस्य किशोरभाई देसाई आणि जिल्हाध्यक्ष संतोष शिर्सेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. मुस्लिम समाजातील असूनही भजनी परंपरा जपणारे केळशी येथील जहांगीर शेख यांना महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल गौरविण्यात आले.

तसेच पखवाज विशारद श्रीधर विचारे यांची भारतीय संगीत कला पीठाचे परीक्षक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

दापोली सांस्कृतिक महोत्सवांतर्गत तालुकास्तरीय भजन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणारे पाडले येथील दत्तसेवक भजन मंडळ (जीवन वसंत गुहागरकर) आणि द्वितीय क्रमांक मिळवणारे पाजपंढरी येथील श्रीराम प्रासादिक भजन मंडळ (स्वरूप अनिल रघुवीर) यांच्यासह धोपावे येथील महिला भजनकार तेजल जाधव यांचाही सन्मान करण्यात आला.

शाखेच्या उपक्रमांसाठी सातत्याने मोफत सुविधा उपलब्ध करून देणारे दापोली शाखेचे सल्लागार व आश्रयदाते प्रवीण गुरव यांचा भगवान लोकरे यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.

राज्य सचिव प्रमोद हर्याण यांनी आपल्या मार्गदर्शनात भजनी कलावंतांच्या हक्कांसाठी व न्यायासाठी संघटनेची स्थापना करण्यात आल्याचे स्पष्ट केले.

तर संस्थापक अध्यक्ष भगवान लोकरे यांनी भजन परंपरेचे संवर्धन करण्याचे महत्त्व अधोरेखित करत, संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त शासनाच्या माध्यमातून दापोलीत भव्य कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला.

दापोली शाखेचे अध्यक्ष रमेश कडू यांनी अध्यक्षीय समारोपात संघटना वाढीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कोषाध्यक्ष विनय गोलांबडे यांनी केले.

या सभेला राज्य कार्यकारिणीचे सल्लागार जयवंत राऊळ, कोषाध्यक्ष अनंत सावंत, सदस्य दत्तात्रय कारेकर, महेश गुरव, प्रदीप सावंत, जिल्हा उपाध्यक्ष संदेश पोळेकर यांच्यासह अनेक कलावंत व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.