दापोली : तालुक्यातील हर्णे गावामध्ये 2 तरूणांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात सामील असलेल्या काही संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे सखोल चौकशी करण्यात येत आहे.

घटनेचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू असून, उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया वेगाने सुरू आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी स्पष्ट केले की, सध्या हर्णे गाव आणि दापोली परिसरात पोलिसांचे पूर्ण नियंत्रण असून शांतता प्रस्थापित करण्यात आली आहे.

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी परिसरात पोलीस कुमक तैनात करण्यात आली आहे. सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांतून पसरवल्या जाणाऱ्या कोणत्याही खोट्या बातम्या किंवा दिशाभूल करणाऱ्या माहितीवर नागरिकांनी अजिबात विश्वास ठेवू नये.

तसेच, जाणीवपूर्वक अफवा पसरवून शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावरही कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.