दापोली (प्रतिनिधी): साहित्य, संस्कृती आणि सामाजिक जाणिवांचा सुरेख संगम घडवणाऱ्या साहित्यिक इक्बाल मुकादम यांना प्रतिष्ठेचा पहिला ‘पंडित खावर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

साहित्य क्षेत्रात अनेक दशकांपासून सातत्याने सुरू असलेल्या त्यांच्या अभ्यासपूर्ण आणि संवेदनशील लेखनाचा गौरव म्हणून हा पुरस्कार देण्यात आला असून साहित्यविश्वात या सन्मानाचे स्वागत होत आहे.

दापोलीमधील ‘जागरण’ सामाजिक संस्थेने यावर्षीपासून साहित्य क्षेत्रातील कर्तबगारीकरिता हा पुरस्कार जाहीर केला आहे. शहरातील पद्मसाई सभागृहात संपन्न झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्याला तालुक्यातील अनेक साहित्यप्रेमी रसिक वाचकांनी उपस्थिती दर्शवली होती.

दापोली अर्बन बँकेचे चेअरमन जयवंत जालगांवकर यांच्या हस्ते हा प्रथम पुरस्कार इक्बाल मुकादम यांना प्रदान करण्यात आला. समाजातील सामान्य माणसाच्या भावविश्वाला शब्दबद्ध करताना मानवी मूल्यांची जपणूक करणारे लेखन ही इक्बाल मुकादम यांच्या साहित्याची ओळख मानली जाते.

त्यांच्या लेखणीतून ग्रामीण जीवन, सामाजिक व्यवस्था, माणसांमधील नात्यांची ऊब आणि काळाच्या बदलत्या प्रवाहातील वास्तव प्रभावीपणे समोर आले आहे. त्यामुळेच वाचकांच्या मनात त्यांनी एक स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.

‘पंडित खावर’ या नावाने दिला जाणारा हा पहिलाच पुरस्कार असल्याने या सन्मानाला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. साहित्य हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून समाजप्रबोधनाचे प्रभावी साधन आहे, ही भूमिका जपणाऱ्या साहित्यिकांचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार सुरू करण्यात आल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

पुरस्कार स्वीकारताना इक्बाल मुकादम यांनी साहित्यिक प्रवासातील आठवणींना उजाळा देत, “लेखन ही केवळ अभिव्यक्ती नसून समाजाशी प्रामाणिक राहण्याची जबाबदारी आहे,” असे मनोगत व्यक्त केले.

यावेळी जागरण सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष मंगेश मोरे, अशोक निर्बाण, पत्रकार मुश्ताक खान, जालगावचे सरपंच अक्षय फाटक, नगरसेविका रिया सावंत, माजी नगरसेवक सचिन गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पांगारकर आदी उपस्थित होते.

या पुरस्कार वितरण सोहळ्याचे औचित्य साधून ‘रंगधारा’ या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कैलास गांधी, सुदेश मालवणकर, सुनील कदम, सचिन चव्हाण, रेखा जगलकर, सुशांत रिसबूड या कवींनी आपल्या रचना सादर केल्या.

साहित्य क्षेत्रात आयुष्यभर केलेल्या योगदानाचा सन्मान म्हणून प्रदान करण्यात आलेला हा पुरस्कार म्हणजे एका समृद्ध साहित्यप्रवासाला मिळालेली आदरांजली असल्याची भावना उपस्थितांमधून व्यक्त होत होती.