रत्नागिरी: कोकणातील काजू उत्पादन आणि त्यावरील प्रक्रिया उद्योगांवरून सध्या सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील प्रस्तावित काजू प्रक्रिया प्रकल्प शेजारील कोल्हापूर जिल्ह्यात वर्ग करण्यात आल्याची चर्चा निव्वळ अफवा असून, रत्नागिरीचा प्रकल्प जिल्ह्यातच होणार असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप सुर्वे यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र राज्य काजू परिषदेने रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये काजू प्रक्रिया उद्योग उभारणीला मंजुरी दिली आहे.
कोल्हापूरमध्ये जागेची उपलब्धता तातडीने झाल्यामुळे तिथे काम वेगाने सुरू झाले, तर रत्नागिरीत अद्याप २५ एकर जागेचा तिढा सुटलेला नसल्याने प्रकल्पाला विलंब होत आहे.
कोकणातील हवामान व संसाधने वापरून होणाऱ्या काजू उत्पादनाचा आर्थिक फायदा स्थानिक पातळीवरच मिळावा, ही रत्नागिरीकरांची मागणी रास्त आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य काजू परिषदेने तिन्ही जिल्ह्यांच्या प्रशासनाला व एमआयडीसीला आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याबाबत पत्रव्यवहार केला होता.
कोल्हापूर एमआयडीसीने याला सकारात्मक प्रतिसाद देत २५ एकर जागा तात्काळ उपलब्ध करून दिली, ज्यामुळे तिथल्या सेंटर ऑफ एक्सलन्स आणि प्रक्रिया केंद्राचा मार्ग मोकळा झाला.
याउलट, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकाच ठिकाणी सलग २५ एकर जागा मिळण्यात अडचणी येत आहेत. ही प्रशासकीय दिरंगाई किंवा जागेची अनुपलब्धता म्हणजे प्रकल्प दुसऱ्या जिल्ह्यात गेला असा होत नाही.
रत्नागिरीचा हक्काचा प्रकल्प कुठेही गेलेला नसून तो जिल्ह्यातच साकारला जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी योग्य जागेचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.
पालकमंत्री उदय सामंत आणि जिल्हाधिकारी मनुज जिंदल हे स्वतः यासाठी विशेष लक्ष घालत असून, एमआयडीसी प्रशासन आणि जिल्हा यंत्रणेच्या माध्यमातून सलग जागेचा प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.
कोकणातील रानमेवा, काजू आणि स्थानिक जैवविविधतेवर आधारित उद्योगांना चालना देणे हे शासनाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे रत्नागिरीतील जागेचा तांत्रिक प्रश्न सुटताच येथील प्रक्रिया उद्योगाला गती मिळणार आहे.
नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी कोणत्याही चुकीच्या बातम्यांवर किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासकीय पातळीवरून करण्यात आले आहे. योग्य ब्रँडिंग आणि स्थानिक तरुणांना रोजगार देणारा हा प्रकल्प लवकरच रत्नागिरीत उभा राहील.

