अप्पा म्हटले की आठवतात आजच्या नेत्यांच्या प्रतिमेबाहेरचे जनसामान्यांचे आपा साळवी! माझा आप्पांशी परिचय आमचे कर्ले जुवे आंबेशेत शिवसेना शाखेच्या स्थापनेचे वेळी १९८६ साली झाला.
आपांचे थिबापॅलेस रोडवरचे घर आमच्या पासून अर्धा तास चालण्याच्या अंतरावर. हे अंतर केव्हाच मिटून गेले. मला भावतात ते अगदी माझ्या विजय सुपर या दुचाकीवर मागे बसून नेवरे गावापर्यंतच्या शिवसेना शाखांच्या स्थापनेसाठी निःसंकोच पणे येणारे आमचे अप्पा साळवी.
आज कार्यकर्ता सुद्धा दुचाकी वर बसत नाही त्या दिवसात हे अविश्वसनीय वाटेलच. त्यावेळच्या नेत्यांची एक मोठी फळी अशीच साधी सुधी! नावे घेतले तर आप्पांच्या जोडीला रत्नागिरीतील जनूभाऊ काळे प्रामुख्याने नजरेसमोर येतात.
हे नेते अगदी पायी येताना संकोचत नसत. त्याकाळी अप्पा म्हणजे शिवसेनेचे समानार्थी नाव! पांढरी सुरवार झब्बा घातलेली त्यांची मूर्ती ते जिल्हाप्रमुख पुढे आमदार झाले तरीही तशीच राहीली.
गोऱ्यापान व्यक्तिमत्वाच्या अप्पांना शोभणरी भरघोस दाढी पूर्वी ते ठेवत नव्हते. बाह्य रूपात जसा फारसा फरक पडला नाही तसाच आपांचा स्वभाव शेवटपर्यंत दिलखुलास आणि निर्मळ राहीला.
बोलताना सहज विनोद करण्याची त्यांची लकब सर्वांच्याच आठवणीत असेल. त्याकाळच्या आम्हां शिवसैनिकांना माननीय शिवसेनाप्रमुख आणि त्यांचे नंतर थेट अप्पा हे दोनच नेते वाटायचे.
माननीय शिवसेनाप्रमुखांचे प्रत्यक्ष दर्शनही त्याकाळी घडले ते अप्पांच्या आशिर्वादानेच! हिंदुत्ववादी असतानाही त्यांच्या निखळ स्वभावामुळे सर्व धर्मात समाजाच्या सर्व क्षेत्रात त्यांचे प्रगाढ स्नेहसंबंध होते. सर्वांशी बोलण्याची त्यांची अनौपचारिक पद्धत आजही अनुकरणीय आहे.
त्याकाळी रत्नागिरीतील शिवसेना ही कोकणातील लोकांच्या मनात असली तरी संघटनात्मक दृष्ट्या बाल्यावस्थेत होती. या काळात विजयराव साळवी हेच आम्हा सैनिकांचे खरे स्फूर्तीस्थान होते.
मग नेमाने सिव्हील हॉस्पिटलला फेरी मारणारे विजयरावांनी पुढची अगदी राजन साळवी, उदय बने, सतीश नाइक, राजू सावंत असे अनेक भविष्यातील राजकिय नेत्यांवर स्वतःचे वागणूकीतून संस्कार घडविले.
त्यांचे वक्तृत्व उत्स्फूर्त होतेच. खड्या अशा खर्जातील आवाजाची देणगी त्यांना लाभली होती. आजच्या काहीशा गढूळलेल्या वातावरणात त्यांची जातीपातीपलिकडे सर्व समाजातील सैनिकांना एकत्र घेऊन जाण्याची क्षमता स्वर्गीय माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या थेट संपर्कातून घडलेली होती.
ते सर्व शिवसैनिकांना पितृस्थानी भासत. अनेकदा मला त्यांच्या व्यक्तिमत्वात, संत तुकारामांची, ऐहिक संसाराविषयीची निरपेक्षता स्पष्टपणे जाणवायची.
अर्थात त्यांच्या संसाराची पूर्ण काळजी घेणा-या त्यांच्या पत्नी या त्यांच्याइतक्याच प्रेमळ आणि सुहास्यवदन इतक्या फकिरासारख्या पतीबद्द्दल नितांत आदर आणि आल्यागेल्याचे आदरातिथ्य आपली नोकरी संभाळून करणाऱ्या वहिनी सर्वांच्या मातोश्रीच्या ठिकाणी भासत.
अगदी काल दर्शन घेताना त्यांच्या घराचे जुने स्वरूप फारसे बदललेले नाही हे प्रकर्षाने जाणवले. जिंकण्याची कोणतीही शक्यता नसताना, सत्ता प्राप्तीची कोणतीही शक्यता धूसर असतांना कोणत्या प्रेरणेने अप्पानी शिवसेनेचे हे शिवधनुष्य हाती घेतले हे आजच्या सकाळ संध्याकाळ निष्ठा बदलण्याच्या दिवसात कळणे कठिण.
रत्नागिरी तालुक्यात रस्त्यांचे जाळे नसताना युतीच्या निवडणूकांमध्ये प्रसंगी पायपीट करून मा कै. तात्यासाहेब नातू, जनूभाऊ काळे, गोताड कुसुमतांईंसोबत फिरणाऱ्या अप्पांचे एकहाती नेतृत्व सर्वांनीच मान्य केले होते.
खरतर मुंबईतून येणारे शिवसेना नेते अगदी दत्ताजी नलावडे, गजानन किर्तीकर, सुभाष देसाई, सुभाष मयेकर, हे सर्व नेते कुणाला दूरचे वाटलेच नाहीत.
अजूनही अप्पा साळवींसोबत रत्नागिरी मधील मासळीमार्केटच्या शेजारच्या पारावर अरू सुर्वेच्या नगरपरिषदेच्या पोटनिवडणूकित मांडी ठोकून बसणारे मा. दत्ताजी नलावडे आठवले कि डोळे पाणावतात. पुढे आप्पा आमदार झाल्याने त्यांच्या तपश्चर्येला सेनाप्रमुखांनी यश दिले.
आमदार झाले तरीही अप्पा तसेच परखड सरळ मनाचे राहिले. आदर्शाची वानवा असलेल्या निष्ठा शब्दकोषात शोधाव्या लागत असताना अशी व्यक्तिमत्वे पहायला मिळाली हा आमच्या सारख्या शिवसैनिकांच्या जीवनातील अमृतयोग.
– राजीव लिमये, कर्ले,
रत्नागिरी 7498575532