शासकीय रुग्णालयातून खासगीकडे रुग्ण पाठवणाऱ्यांवर कारवाईचे उदय सामंत यांचे आदेश

रत्नागिरी: प्राथमिक आरोग्य केंद्रातून जाणीवपूर्वक खासगी रुग्णालयांकडे प्रसूतीसाठी रुग्ण पाठवणाऱ्यांवर कडक कारवाई करा आणि त्यासाठी भरारी पथके तैनात करा, असे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत.

जिल्हा शासकीय रुग्णालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

गेल्या दोन वर्षांत जिल्हा रुग्णालयाच्या कामात मोठी सुधारणा झाली असून, गुडघारोपणासारख्या जटिल शस्त्रक्रिया येथे यशस्वी होत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामुळे आता १४५

डॉक्टर्स उपलब्ध असून आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम झाली आहे. रुग्णालयासाठी २ कार्डियाक आणि १२ सर्वसाधारण रुग्णवाहिकांचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

गरीब आणि गरजू रुग्णांवर शासकीय रुग्णालयातच उपचार होतील याची दक्षता घेण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले.

या बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक भास्कर जगताप, अधिष्ठाता जयप्रकाश रामानंद, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये, विलास चाळके, हर्षदा गावडे, श्रद्धा मोरे, अभिजित दुडे, सुहेल मुकादम, बंड्या साळवी आणि इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

दिव्यांग प्रमाणपत्रांच्या टक्केवारीतील तफावतीबाबत चौकशी केली जाईल, तसेच प्रलंबित पेन्शनसाठी विशेष शिबिरे आयोजित केली जातील, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

दुसऱ्या एका बैठकीत त्यांनी कसबा संगमेश्वर येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या कामाचा आढावा घेतला.

या स्मारकासाठी उपलब्ध ५ कोटी निधीतून प्रवेशद्वार, पुतळा परिसर सुशोभीकरण आणि इतर सुविधांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी जिल्हाधिकारी मनुज जिंदल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*