सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मान्यतेसाठी पुन्हा एकदा राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून पाहणी होणार आहे. मात्र त्यासाठी पाठवलेल्या पत्रात आतापर्यंत झालेल्या तब्बल तीनवेळच्या सुनावणीत प्रस्तावित मेडिकल कॉलेजच्या प्रशासनाकडून राहिलेल्या त्रूटींचे पोस्टमार्टेमच करण्यात आले आहे. यामध्ये इमारत बांधकाम दाखवताना कार गॅरेज दाखवल्याचे, अध्यापक उपलब्ध असल्याचे सांगूनही प्रत्यक्ष ते दाखवू न शकल्याचे गंभीर उल्लेख आहेत. राज्याकडून आर्थिक तरतूद, खासदार विनायक राऊत यांनी केलेला पाठपुरावा, अध्यापक भरतीसाठी एमपीएससीची जाहिरात, अशा जमेच्या बाजू असतानाही प्रशासनाकडून त्रुटी पूर्ततेबाबत संधी मिळूनही फारसा फरक पडत नसल्याने सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज लवकर मार्गी लागण्याबाबत अनिश्‍चितता निर्माण झाली आहे.