गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं भितीचं वातावरण निर्माण केलं आहे. ओमिक्रॉन वेगाने जगभर पसरत असून त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.


अद्याप ओमिक्रॉन जीवघेणा ठरल्याची कोणतीही माहिती आली नसल्यामुळे काहीसं दिलासादायक चित्र असलं, तरी देखील त्याचा वेगाने फैलाव होत असल्यामुळे सर्वच देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ लागली आहे.


या पार्श्वभूमीवर ओमिक्रॉन विरोधातील लढ्यामध्ये एक नवं साधन आरोग्य यंत्रणेच्या हाती आलं आहे. आयसीएमआर अर्थात इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं ओमायक्रॉनच्या चाचणीसाठी टाटा मेडिकल अँड डायग्नोस्टिक्सतर्फे तयार करण्यात आलेल्या RT-PCR किटला मान्यता दिली आहे.


ओमिश्यूअर असं या नव्या टेस्टिंग किटचं नाव आहे. ओमिश्यूअरमुळे आता जेनोम सिक्वेन्सिंगसाठी न पाठवता देखील ओमायक्रॉनचं 10 ते 15 मिनिटांत निदान करणं शक्य होणार आहे.


ओमिश्यूअर आरटीपीसीआर किट आरोग्य यंत्रणेच्या हाती आल्यामुळे ओमायक्रॉनचं लवकरात लवकर निदान करून जास्तीत जास्त व्यक्तींच्या चाचण्या करणं शक्य होणार आहे.