चिपळूण– रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे पूरपरिस्थितीमुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतकार्यासाठी महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या पुढाकाराने महापालिकेची ३ वैद्यकीय पथके सोमवारी चिपळूणला रवाना करण्यात आली. या प्रसंगी महापालिका भवन येथे महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी सर्व पथकाला शुभेच्छा दिल्या. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सूचनेनुसार ठाणे महानगरपालिकेच्यावतीने आरोग्य, घनकचरा, पाणी विभागाचे १५० पेक्षा जास्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची पथके महाडला यापूर्वीच रवाना झाली आहेत.

यासोबतच चिपळूणची पूरपरिस्थिती पाहता तिथेही मदतकार्यासाठी पथके पाठवण्याची सूचना मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांनी दिल्यानंतर महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या पुढाकाराने महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाची ३ वैद्यकीय पथके रवाना करण्यात आलीत. ही पथके महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या नियंत्रणाखाली स्थानिक जिल्हा प्रशासन, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी व संजय हेरवाडे यांच्या समन्वयाने मदतकार्य करणार आहेत. यामध्ये कोविड, साथ रोग आणि ताप सर्वेक्षणासाठी वैद्यकीय पथके पाठविण्यात आली आहेत. या पथकांसोबत रॅपिड अँटिजेन टेस्टिंग कीटस्, मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस टेस्टिंग कीटस्, तीन डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय आणि मोठ्या प्रमाणात औषधसाठा पाठविण्यात आला आहे.