दापोली : महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त (२ जानेवारी) शिवसेना पक्षाच्या वतीने उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.

पोलीस दलाच्या समर्पित सेवेचे कौतुक करताना शिवसेना नेत्यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या योगदानाची मुक्तकंठाने प्रशंसा केली.

निरीक्षक महेश तोरसकर यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात तसेच गुन्हे नियंत्रणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, असे नेत्यांनी नमूद केले.

यावेळी शहरातील पार्किंग व्यवस्थापनाच्या समस्येविषयी सविस्तर चर्चा झाली. शहरातील वाढत्या वाहन संख्येमुळे निर्माण होणाऱ्या पार्किंगच्या अडचणींवर उपाययोजना करण्याबाबत सूचना मांडण्यात आल्या.

यासह शहरातील रस्ते सुरक्षा, ट्रॅफिक व्यवस्था सुधारणे, अतिक्रमण हटवणे आणि नागरिकांच्या दैनंदिन समस्यांवर सकारात्मक विचारविनिमय झाला.

शिवसेना नेत्यांनी पोलीस दलासोबत समन्वय साधून शहर विकासासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले.

यावेळी नगराध्यक्ष कृपा घाग, नगरसेविका प्रीती शिर्के, माजी नगरसेवक प्रकाश साळवी, माजी नगरसेविका शबनम मुकादम, शिवसेना शहर संघटक मंदार केळकर, शशांक घाग, सतीश उर्फ बाबू शिर्के, अमोल लांजेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक पुजा हिरेमठ, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र यादव, वाजिद खान आदी मान्यवर उपस्थित होते.