दापोली- दापोली तालुकास्तरीय नासा-इस्रो चाळणी परीक्षेत तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा चंद्रनगरच्या दोन विद्यार्थिनींनी अव्वल यश संपादन केले असून त्यांची रत्नागिरी जिल्हास्तरीय चाळणी परीक्षेसाठी निवड झाली आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषद दरवर्षी जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पाचवी ते सातवीतील विद्यार्थ्यांसाठी नासा-इस्रो भेट दौऱ्याचे आयोजन करते. केंद्र, तालुका तसेच पुढे जिल्हास्तरावरील चाळणी परीक्षेत अव्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांची नासा व इस्रो या अवकाश संशोधन संस्थाना प्रत्यक्ष भेट घडवून आणते.
दापोली तालुकास्तरीय चाळणी परीक्षेत चंद्रनगर शाळेतील कु. आरोही महेश मुलुख हिने प्रथम तर कु. नीरजा मनोज वेदक हिने द्वितीय क्रमांक पटकावला असून या दोघींसह एकूण दहा विद्यार्थ्यांची रत्नागिरी जिल्हास्तरीय चाळणी परीक्षेसाठी निवड झाली आहे.
या विद्यार्थीनींना शिक्षिका मानसी सावंत यांचे मार्गदर्शन लाभले असून मुख्याध्यापक मनोज वेदक, शिक्षक बाबू घाडीगांवकर, रेखा ढमके यांचे सहकार्य लाभले आहे.
चंद्रनगर शाळेतील दोन विद्यार्थ्यांनी या चाळणी परीक्षेत दापोली तालुकास्तरावर अव्वल यश संपादन केल्याबद्दल चंद्रनगर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुपेश बैकर, उपाध्यक्ष अनिल मुलुख, चंद्रनगरच्या सरपंच भाग्यश्री जगदाळे, उपसरपंच राजेंद्र मिसाळ, जिल्हा नियोजन समिती अध्यक्ष मोहन मुळे, गटशिक्षण अधिकारी रामचंद्र सांगडे, दापोली शिक्षण प्रभागाचे विस्तार अधिकारी बळीराम राठोड, गिम्हवणे केंद्रप्रमुख सुनील कारखेले, चंद्रनगर ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष श्रीधर जाधव तसेच चंद्रनगर गावातील सर्व शिक्षण प्रेमींनी व संस्थांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.

