– बेबी मावशी

छत्रपती शिवरायाच्या ‘राकट देशा कणखर देशा’ महाराष्ट्र देशाचा उद्योगमंत्री, ‘माझी मर्‍हाटाची बोलू कौतुके, अमृतातेही पैजा जिंके’ ह्या ज्ञानेश्वर माऊलींच्या उक्तीने संपन्न असणार्‍या मराठी भाषेचा मंत्री, चौदा विद्या चौसष्ट कलांची देवता सरस्वती, ज्याच्या वाणीतून पाझरते त्या वक्तृत्त्वाला सलाम करून त्यांच्या प्रत्येक सभांना हजर राहणार्‍या जनसमुदायाचा मानबिंदू उदय साहेब, नाट्यपरिवाराचा, सिनेविश्वाचा, राजकीय बैठकींचा उदय सामंत परिवारातील ज्येष्ठांचा उदू, कौतुकाच्या भैयाचा उदय, उदू बाबा, उदू चाचा, उदू मामा, उदू दादा आज आपल्या वयाची पन्नाशी ओलांडत आहे, ही एक अभिनंदनाची आणि आनंदाची पर्वणी.

‘पाळण्यातलं मूल चंद्राची कला जशी वाढते तसं वाढायला लागतं, बघता बघता ते हात पाय हालवतं. ते दुडदुडत चालायला लागतं, पळायला लागतं, शाळेत जातं.

श्रीगणेशा म्हणत पाढे पाठ करत परवचा म्हणत पुस्तक वाचतं आणि शिक्षकांच्या तसेच आई-वडिलांच्या प्रसंशेला पात्र ठरतं. ते आई – बाबांचं – आजी – आजोबांचं शिक्षकांचं अनुकरण करत प्रशंशापात्र ठरतं. डिग्या घेत, स्वत:चे निर्णय स्वतः घेतं.

ज्ञानसंपन्न होत स्वावलंबी होतं. आई – बाबांपेक्षा उंचीनं, जाडीनं आणि कर्तृत्त्वानं मोठं होतं. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचा उदय.

उदयचा जन्म गोवा राज्यातल्या ‘मठग्रामस्थ’ नगरीत मडगाव शहरात डॉ. गोपिकाबाई नाईक हॉस्पिटलमध्ये (सिने विशांतजवळ) झाला.

त्यावेळी उदयचे आजोबा स्व. काशिनाथ बाळकृष्ण सामंत आपल्या व्यवसाय धंद्यानिमित्त मडगांवी वास्तव्य करून होते.

उदयची आई स्वरुपा आणि उदयचे बाबा रवीअण्णा दोघंही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला ह्या गावचे.

स्वरुपा उदयच्या जन्मावेळी गरोदर असताना, वेंगुर्ल्याच्या वास्तव्यात योग्य डॉक्टरांचे उपचार, आवश्यकतेच्या वेळी मिळणं कठीण झालं होतं.

सेंट लुकस हॉस्पिटलमध्येही निष्णांत डॉक्टरांची कमतरता होती. डॉक्टरांच्या सल्ल्‌याची गरज लागली किंवा उपचारांची आवश्यकता लागली तर लोकांना बेळगांवला किंवा गोव्याला धावावे लागे.

गरोदर असताना सुलुला प्रेशरचा (बीपीचा) त्रास सुरू झाला. बाळंतपणाच्या वेळी जर अधिक त्रास झाला तर काय ? ह्या विचाराने माझे वडील अस्वस्थ झाले.

त्यांनी उदयच्या आजी-आजोबांच्या विचारानं रवी अण्णांना सांगून निर्णय घेतला आणि तिला बाळंतपणासाठी मडगांवला आपल्या घरी आणलं आणि डॉ. शालिनी केरकर आणि डॉ. देवदत्त केरकर (गायनॉकॉलॉजीस्ट) या दोन नामांकित डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली ठेवलं.

त्यांच्या पाठीमागे डॉ. कोटणीस आणि डॉ. खोत यांचा वैद्यकिय व्यवसायिकांचा आनुवंश असल्यामुळे माझे वडील निर्धास्त बनले.

रवीअण्णांचे वडील स्व. नाथभाऊ यांचा माझ्या वडिलांवर खूप विश्वास. दोघांमध्ये पूर्वीपासून मैत्रीचं नातं. त्यामुळं अतिशय प्रेमानं त्यांनी संमती दिली व सुलूचं बाळंतपण मडगांवी सुखरुपपणे पार पडलं.

उदयचा जन्म डिसेंबर २६, १९७५चा. डॉ. गोपिकाबाई नाईक नर्सिंग होमच्या जवळच राहणारी जयश्री शेटकर ही त्याची आया किंवा हॉस्पिटलमध्ये दोघांची आईची व बाळाची काळजी घेणारी दायी. (आतापर्यंत सुलूने तिच्याशी प्रेमाचे संबंध ठेवले होते. दोन वर्षांपूर्वीच ती वारली).

हॉस्पिटलमध्ये ये-जा करून खाणे-जेवण (बाळंतिणीला) पोचविण्यासाठी मदतनीस संच माझे वडील आणि सुलूचे सासरे नाथभाऊ आणि मुद्दाम म्हणून बाळाला आंघोळ आणि तेल लावून मालिश करण्यासाठी वेंगुर्ल्याहून आयात केलेली शांता मावशी.

सुवीण जेवण- खाणं तयार करणारी मी. सुलूच्या सासुबाई माझी आई. हा असा संच उदूची दैनंदिन वाढ पाहणारा प्रेक्षकवर्ग आणि सर्वांचा सहाय्यक विजयपंत वालावलकर.

गुटगुटीत बाळ हॉस्पिटलमधून अकराव्या दिवशी सुलू आणि इतर लवाजम्यासकट वेंगुर्ल्याच्या घरात आजोळी आलं आणि उदूच्या पणजीनं सुलूच्या आजीनं त्याचं दर्शन घेतलं.

झोपेत आपल्यातच गालातल्या गालात हसणारं त्याचं रूप पाहून म्हटलं, ’चंद्रहास्य’ मी ह्याचे चंद्रहास्य बघून आनंदित झाले. त्या कौतुकानं त्याला ह्या नावानं मी हाक मारायची. पाळण्यातलं नाव त्याचं उदय. त्याचे आजोबा म्हणजे माझे वडील म्हणत ‘रवीकिरणोदय’.

उदयचे बालपण घरातील बाळगोपाळांच्या सहवासातले शुभा आतेच्या सहवासात शिस्तीत, टिवल्या बावल्या करत, गोष्टींतून बालकथा ऐकत उदय मोठा होत होता.

आशू, मिलिंद ही मुंबईहून येणारी आतेभावंड, किरणभैय्या सख्खा भाऊ, स्मिता, सुभाष, सतीश ही मामेभावंडं. सगळी मागची पुढची. वयात अंतर एकदम कमी.

प्रसाद, सचिन, प्रशांत, सलिल ही त्यातली छोटी आते भावंडं. ह्या मोठ्या फलटणीचे अनुकरण करणारे मावळे – शिलेदार आणि त्यातल्या त्यात खोडी काढून जास्तीत जास्त ज्याची गंमत उदय, सुभाष, किरण करायचे तो म्हणजे पप्पू – प्रसाद (आताचा तगडा मेकॅनिकल इंजिनिअर)… हे सगळं करताना आपल्या आईचा पदर धरून वावरताना उदयला मोठी सुरक्षितता वाटायची.

वेंगुर्ल्याच्या घरात ‘माई आजी’ म्हणजे माझी आई. त्याला नेहमी छोट्या रंगीत पाटावर बसवून जेवायला वाढी. वरण, भात आणि बटाटा कचरी (कापे) ह्या त्याच्या आवडत्या पदार्थांची (लहानपणीच्या) साथ म्हणजे त्याची त्यावेळची मेजवानी विशेषत: मे महिन्यात छबी, प्रमोद, अंजू माहेरवाशीणी म्हणून आल्या की त्यांच्या उपस्थितीत शुभा आतेचा फेव्हरेट नाश्ता रगडा-पॅटीस तयार असायचा आणि किरण, उदू, आशू, मिलिंद, प्रसाद, स्मिता, शुबू आणि सतीश यांच्यासमवेत व्हायचा. एवढा एकोपा होता सगळ्या भावंडात.

खानदानी एकत्र कुटुंबातली लोकशाही पद्धतीची जीवनशैली. सगळ्यांचा विचार करून एकमेकांच्या सुखात, सगळ्यांशी प्रेमाने व सहनशिलतेनं वागणं ह्या सुसंस्काराचे बाळकडू उदयला आई- अणणांकडून मिळाले.

वेंगुर्ला तालुक्यातील सामंत नेवाळकरांच्या घरातील कुलदीपक गोवा राज्यात मडगांवला जन्मला आणि पल्लिनाथाच्या आशिर्वादाच्या गावातला एक खोडकर, मिश्किल भावनाप्रधान, हुशार विद्यार्थी म्हणून पाली शाळेत ओळखला जाऊ लागला.

बालसमूहामध्ये उदूचे विदुषकी चाळे नेहमी चालत. कुटुंबात तसेच शाळेत सदैव हास्याची खसखस पिकवणारा उदू कधी एकदा येतो म्हणून घरात तसेच शाळेत त्याची वाट बघितली जाई.

विद्यार्थी विश्वात तो विद्यार्थीप्रिय ठरला. त्याची साक्ष समाजाभिलेख डेलळेसीरा’ काढून त्याची विद्यार्थीप्रियता हायस्कूल व कॉलेज जीवनात तज्ज्ञ शिक्षकांनी मान्य केली.

त्यावेळी हा सामंतांचा नातू राजकीय जीवनाचा मोठा आधारस्तंभ बनून महाराष्ट्राचा शैक्षणिक आणि औद्योगिकमंत्री निवडला जाणार याची कुणाला कल्पना होती?

आज रत्नागिरी जिल्ह्याचा, रत्नागिरी शहराच्या विकासाचा तो शिल्पकार ठरला. ’स्मार्ट सिटी’ म्हणून रत्नागिरीला रत्नमुकूट चढविणार्‍या उयला ’अष्टपैलू कोहिनूर’ हा सन्मान द्यावा लागेल, असं म्हटलं तर अतिशयोक्ति होणार नाही.

उदय हा घर, शाळा आणि समाज यांना जोडणारा दुवा.
जातबंधन, धर्मबंधन, आर्थिकबंधन, सामाजिकबंधन लहानपणापासूनच न मानणारा.

’सर्व देवं नमस्कृत्य केशवम् प्रति गच्छती’ ही शिकवण देणारे. ‘आपुलकीनं, प्रेमानं आणि माणुसकीनं, माणसाशी माणसानं वागावं’ हा धडा देणारं आणि गिरवायला लावणारं त्याचं विश्वव्यापी कुटुंब.

बंधुभाव, समाजावर निष्ठा, सर्वांशी समानता ह्या तीन गोष्टींचं कंगन हातात बांधून ’समाजसेवा ही ईश्वरसेवा’ हे सेवाव्रत घेऊन वावरणारा हा सुसंस्कारी दीनबंधू. ’विद्या विनयेत शोभते’ हा त्याचा अलंकार.

आम्हा सर्वांचा हा अभिमानरूपी केंद्रबिंदू. तळागाळातील लोकांचं भलं चिंतणारा व त्यांच्यामध्ये शिरणारा रात्रंदिवस जनतेची चिंता करणारा हा ध्यासपंथी विश्व हितचिंतक.

संतजनात राहिला देव सेवेत पाहिला. ’सेवा’ ही त्याची कार्यपद्धती. एक कष्टाळू, धडपडणारा कार्यकर्ता नेता जेव्हां सतत धडपडत, न थांबता काम करतो तेव्हा त्याच्यातील दैवी शक्तीला नमस्कार करावा लागतो.

’थांबला तो संपला’, ’धावत्याला शक्ती येई आणि रस्ता सापडे’ ही कविवर्य माधव ज्युलियन यांची काव्यपंक्ती त्याला बरोबर लागू होते.

त्याची धडपड त्याच्या बरोबरीच्या कार्यकर्त्यांना जिव्हाळा देते. काम करण्याची इतरांना प्रेरणा देणारा हा लोभसवाणा सिंधुदुर्गपुत्र सगळ्यांनाच हवा हवा वाटतो.

उदय एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व. आकर्षक बोलका चेहरा, खेळकर, हसरा, खिलाडू वृत्तीचा, प्रसन्नता घेऊन वावरणारा, जिथे जाईल तिथलं वातावरण बदल घडवणारा आणि ‘प्रसन्न वदने प्रसन्न होशी प्रसन्न करीशी’ या नात्यानं जनतेकडं, लोकांकडं धावणारा आणि जनतेला जवळ घेणारा.

जनताजनार्दनाला देव मानून त्यांच्यासमोर जाताना भूक, तहान, खाणं, जेवणं याची तमा न बाळगणारा. आई – वडील, मुलं – बाळं, संसार, सगे-सोयरे यांच्या वाट्याला न येणारा ’चिंता करीतो विश्वाची’ ही समर्थ रामदासांची उक्ती त्याला योग्य ठरावी.

गप्पागोष्टी, कौटुंबिक हितगूज, कुजबूज या भावनिक संभाषणापासून तो पूर्णपणे अलिप्त. ‘महाराष्ट्र माझा’ अवघा महाराष्ट्र माझा अशी गर्जना करत ध्येयानं, निष्ठेनं जनतेच्या सुख-दु:खाशी, हर्ष खेदाशी एकरूप झालेला विश्वरूप कायकर्ता.

महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली, दुष्काळ पडला, ढगफुटी झाली, धरणीकंप झाले, मोठेमोठे अपघात झाले. दहशतवाद्यांनी माणसांशी माणुसकीशून्य वर्तणूक केली.

त्या त्या वेळी मदतीचे हात पुढे करून द्रुतगतीनं धावला उदय. राजकीय, सामाजिक प्रश्नांना धरून कार्यकर्त्यानं उपोषण केलं, कुणी संप केले, कुणी कुणाला अटीतटीने नमवायचं ठरविलं तर, ’गोष्टी सांगेन युक्तीच्या चार’ हा श्रीकृष्णासारखा हितकारी कानमंत्र देणारा आणि कायापालट घडवून आणणारा सर्वांना हवा हवास वाटणारा उदय.

एक तत्त्वज्ञ, मित्र मार्गदर्शक या नावाने सकारात्मक धोरण वापरून समाजापुढे आदर्शवत वावरणारा उदय.

प्राप्त परिस्थितीत समोरा जाऊन, काट्याकुट्यातून आशावादी नजरेनं ’मंजूर तुज तेचि घडे स्वीकार करण्या शक्ती दे’ असे भगवंताशी मागणे मागून, राजकीय मार्गावरचा दीपस्तंभ म्हणून उभा राहणारा तेजस्वी उदय.

अशा ह्या उदयोन्मुख, दैवी देणगी असणार्‍या सुपुत्राने २५ वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या उज्ज्वल इतिहासाचा शुभारंभ केला.

शाळेत मॉनिटर (वर्ग प्रतिनिधी), कॉलेजचा सरचिटणीस (जनरल सेक्रेटरी), संगीत, नाटक, नाट्यछटा यांचा नायक आणि त्याला साथ देणारी व इतरांना खदखदून हसवणारी त्याची वानरसेना.

मस्तमजेदार, घरातली फलटण किरणभैया, शुब्बूदादा, आशू, मिलिंद, स्मिता. शाळेत बाळा, सदा, पिंट्या, शिरी, काळू, गोरू यांचा जमाव.

एकट्याने म्हणून उदूनं कधी पेपरमिट किंवा चॉकटेल, लाडू खाल्लाच नाही. हा तरुणांचा आदर्श. पाली युवा मंचचा अध्यक्ष केव्हा झाला आणि रत्नागिरी जिल्हा युवक कॉंग्रेसचा उपाध्यक्ष केव्हा झाला हे आम्हाला कळलच नाही.

समाजकारण आणि राजकारण यांची यशस्वी सांगड घालणारा हा एक ध्येयनिष्ठ समाजसेवक. लोकांसाठी, लोकांचे प्रश्न, त्यांचं मन समजून घेणं आणि निःस्वार्थपणे त्यांच्याशी एकरूप होणं हा त्यांच्या तडफदार व्यक्तिमत्त्वाचा खास पैलू.

तरुण पिढीसमोर अनुकरणीय असा, सडेतोड वकृत्त्व असलेला एक नि:स्वार्थी राष्ट्रसेवक.
तरुण असताना वडिलांचा व्यवसाय सांभाळून समाजात वावरत असताना लोकांच्या उपयोगी पडत असताना स्वयंप्रेरणेनेच उदय पुढं सरसावला.

त्याची तिच वृत्ती अजूनही आहे. लहानपणापासून एक दूरदृष्टीने भरलेली त्याची सकारात्मक कृती सगळे पहात होते. बूड असलेले खाऊन पिऊन सुखी असलेलं श्रीमंत घर.

त्यामुळं पदरचं खाऊन लष्कराच्या भाकर्‍या भाजायला निघालेली आई – वडिलांची पूर्वपुण्याई असलेलं उदयचं घरंदाज व्यक्तिमत्व, वडील कॉन्ट्रेक्टर, तसेच बागायतदार, सधन शेतकरी, भाऊ इंजिनियर, स्वत: उदय ऑटोमोबाईल इंजिनिअर. त्याचे चैतन्यमय, स्फूर्तिदायी, खेळकर व्यक्तिमत्व त्याचे युवानेतृत्त्व जितेंद्र आव्हाड पहात होते.

‘लाथ मारीन तिथं पाणी काढीन’ ही त्याची सृजनशील कतृत्त्वशक्ती, सात्विक आणि जिद्दी, कष्टाळू वृत्ती ओळखून आव्हाडांनी त्याला पद दिले. त्यावेळी महाराष्ट्राची अस्मिता जपणारे माननीय शरद पवारजी ह्याचे पितृतुल्य आशिर्वाद उदयला लाभले.

तो त्यांच्या गटाचा कार्यकर्ता म्हणून वावरू लागला. तळागाळातील बेरोजगार लोकांचे दुःख तो पाहत होता. त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी छोटेमोठे उद्योगधंदे कसे देता येतील, युवकांचा उत्कर्ष होण्यासाठी काय करता येईल हा विचार घेऊन त्यांनं कामाचा कार्यबिंदू ठरवला आणि भ्रष्टाचार, अत्याचार करणार्‍यांना बाजूला सारून शुद्धत्त्व स्वीकारणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कास त्यानं धरली.

शरदराव पवारजींनी इंदिरा कॉंग्रेसकडून घेतलेली फारकत त्याला पटली. साहेबांची धोरणे त्याला आवडली आणि त्यानं राष्ट्रवादी कॉंग्रेस स्वीकारली.

उदयनं आपला ठसा महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी उमटवला. महाराष्ट्र राज्याचे आजचे विद्याविभूषित विनयशील स्वभाव असलेले हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व म्हणजे उदय.

महाराष्ट्राच्या तरुणाईचं ते आशास्थान, प्रेरणास्थान आणि वृद्ध जाणत्या लोकांचा तो ’आशादीप’. विद्याविभूषित, अगोदरचा उच्च शिक्षणमंत्री, आजचा उद्योगमंत्री डॉ. उदय रवींद्र सामंत पल्लिनाथाच्या आशीर्वादाच्या ’पाली’ वासियांचा लाडका उदय.

अण्णांचा, सुलूचा भैयाचा (किरणचा) उदू ’रविकिरणोदय’ हा ब्रह्मा विष्णू महेशरूपी कर्तृत्त्वाचा तिरंगा हा त्रिवेणी संगम म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील सामान्य नागरिकांच्या मनाला हवाहवासा वाटणारा प्रेमाचा दुवा.

अत्यंत आपुलकी असलेल्या नि:स्वार्थ निरपेक्ष मनानं एक माणूस म्हणून दुसर्‍या माणसाचं दुःख जाणून घ्यावं आणि ते दुःख दूर करण्यासाठी प्रेमाची फुंकर कशी घालावी हे याच अण्णाकिरण व उदूकडून शिकावं.

एकरूपता, समीपता साधून गरजूंना कुणी कशी मदत करावी, किती मदत करावी, दुःखी माणसांकडं मदत घेऊन कोणत्या वेगाने धावत जावं हे त्यांच्याकडून शिकावं. गरजू, होतकरू, आर्थिकदृष्ट्‌या वंचित मुलांना शैक्षणिक मदत देऊन त्यांचे व्यक्तिमत्त्व खुलवणे हा त्यांच्या घराण्याचा स्थायिभाव.

रंजलेल्या- गांजलेल्याला, पीडलेल्या आजारी व्यक्तीला वैद्यकीय मदत मिळवून देण्याची खटपट उदय करतो. ही मदत देण्यासाठी सतत धडपडत धावून जाण्याचं काम करायला त्यांचे दोन हात म्हणजे किरणभैया आणि रवीअण्णा. उदयचा भावनिक आधार हे दोघेजण.

किरण आणि अण्णा हे त्यांचं बालपणापासूनचं हळवं असं मायेचं पवित्र क्षेत्र. भरलेल्या हातानी सगळ्या ठिकाणी आपल्या कुवतीनुसार, ’मायेची शाल’ पांघरायला हे तिघेही ह्या टोकापासून ते त्या टोकापर्यंत धावत असतात.

पण जेव्हा जीवाची पर्वा न करता, गरुड वेगाने कधी सोलापूर, कधी सिंधुदुर्ग, कधी चंद्रपूर, कधी रत्नागिरी असा विमानानं भरारी घेणारा उदय जेव्हा टीव्हीवर भाषण करताना डोळ्यांना दिसतो व कानांना ऐकू येतो तेव्हा मात्र माझं अंत:करण कौतुकानं आणि वात्सल्यानं भरून येतं.

आपल्या औद्योगिक किंवा व्यापारविषयक आस्थापनात बेकार, गरजू तरुणांना नोकर्‍या मिळवून देण्यासाठी तो आपल्या शब्दांचा उपयोग त्यांच्या शिफारशीसाठी करतो. जनहितासाठी हा झपाटल्यासारखा वावरतो आणि इतरांच्या आनंदात आपला आनंद मानतो आणि आनंदयात्री म्हणून राहतो ही त्याच्या मनाची घडण म्हणजे परमेश्वराची खूप मोठी देणगी.

त्याचा मला अभिमान वाटतो. आम्हा सामंतांच्या सर्वांच्या अभिमानाचा केंद्रबिंदू – उदय २०१९ च्या ’कोवीड’ चिंताग्रस्त काळात धडपडून कार्यरत राहिला.

चिंताकाळात लोकांची चिंता दूर करणारा तो चिंतामणी ठरला. आपले दौरे त्याने खेड्यापाड्यात, शहरात आयोजित केले. तिथल्या वैद्यकीय सेवांना प्रोत्साहन दिल आणि सामान्य जनतेला चिंतेपासून दूर ठेवण्यात यश मिळविलं.

आपल्या दौर्‍यामध्ये खेड्यापाड्यातील, तालुक्यातील गरजवंतांना किंवा कार्यकर्त्यांना उदय कधीच रिकाम्या हातानं जाऊ देत नाही. सतत काम करण्याची त्याची जिद्द, त्याची सकारत्मकता, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्‌या वंचित आणि मागासलेल्या मुलांसाठी अनुकरणीय आहे.

सुसंस्कारांचे अमृतमय नंदनवन फुलवणारे बागवान म्हणजे अण्णा, वहिनी, किरण आणि उदय. पालीसारख्या खेडेगावात डी.जे. सामंत अनिरुद्ध एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शिक्षणापासून ते महाविद्यलयापर्यंत विद्यार्थ्यांन घडविण्याचे कार्य करत आहे. त्याचे प्रतिक ’श्रम हाच राम’ मानून कष्टानं प्रयत्नशील राहणारे विद्यार्थी. २००४ सालापासून उदय स्थानिक जिल्ह्याच्या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून मंत्रिमंडळात दाखल झाला.

तेव्हापासून ते आतापर्यंत तो विद्यार्थ्यांची विधायक निर्मिती घडवावी, परमेश्वररूपी सद्गुरूचे कर्तेपण त्यांनी मान्य करावे, गुरूजनांचं, ज्येष्ठांचं श्रेष्ठत्त्व व आपण नम्रपणे आपलं काम करीत जावं आणि दया, क्षमा, प्रेम, सहकार्य, शांती, समता, बंधुत्वरूपी प्रेमज्योत सतत मनात ठेवावी व माणुसकीनं बनलेला मानव बनावं ह्या अपेक्षेनं नवपिढीकडं पाहतो.

’नर करनी करें तो नर का नारायण बन जाता है’ या उक्तीनुसार आपल्या विधायक, आशावादी धडपड्या वृत्तीनं आपल्या या पंचवीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत आमदार, पंचायत राज्य कमिटी अध्यक्ष, म्हाडाचे अध्यक्षपद, राज्यमंत्रिपद, उच्च व तंत्र शिक्षणमंत्रीपद आणि आजचे उद्योगमंत्रीपद अशा विविध स्थानावर विराजमान होण्याची संधी परमेश्वरानं त्याला दिली.

या पदाचा आदर करून त्या पदाला न्याय देण्याचं काम उदयनं करतो. आपला मतदारसंघ, आपला रत्नागिरी जिल्हा, आपला कोकण प्रांत, देशात कायम विकासात्मक दर्जानं पुढं यावेत हा त्यांचा सतत प्रयत्न असतो. जास्तीत जास्त उद्योगसमूह महाराष्ट्रात यावेत यासाठी त्याचे चाललेले अथक परिश्रम वर्तमानपत्रातील व टी. व्ही. वरील बातम्यांतून ऐकायला, वाचायला मिळतात. तेव्हां त्यांच्या दूरदृष्टीची भरभरून वाहवा व्हावी हा विचार मनात येवो व इथून दृष्ट काढते तुझी, असं म्हणून त्याचं औक्षण करावंसं वाटतं.

रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासात आणि महाराष्ट्राच्या इतिहासात सामान्य जनतेच्या अंत:करणात उदयचं स्थान लाडक्या लेकाचं आणि त्याचं कतृत्त्व लाखमोलाचं. देशातलं पहिलं सागरी विद्यापीठ उभारण्याचा घेतलेला निर्णय किंवा छत्रपती शिवरायांच्या हाती धनुष्यबान घेतलेला पहिला पुतळा उभारण्याचा घेतलेला निर्णय तसंच कविकुलगुरू कालीदास संस्कृत विश्वविद्यालयाचं भारतरत्न पी.व्ही. काणे उपकेंद्र हे त्याच्या जनता हितकारक कामाचे पैलू गौरवास्पद ठरावेत.
उदयचं प्रत्येक कार्यपाऊल शिवसेनाकार बाळासाहेबांच्या विचाराचं. ’जीवनात एकदा निर्णय घेतला की मागे फिरू नका’ कारण मागं फिरणारे इतिहास रचू शकत नाहीत.

उदयला राजकारणात साथ मिळाली मा. ना. श्री. एकनाथ शिंदे, मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस, मा. ना. श्री. अजित पवार यांची. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री महाराष्ट्राच्या लोकशाही मंदिरात उद्योगमंत्री म्हणून उदयच्या पाठीमागे मित्रत्त्वाच्या भावनेने त्याच्या वाटचालीत पाठिंब्याने सतत राहतात, ही भाग्याची पर्वणी. त्यामुळं राजकीय कारकिर्दीत त्याच्या मतदारसंघामध्ये शहरविकास ग्रामीणविकास, सामाजिकविकास आणि जनतेच्या विविध समस्या यांच्यावर द्रुतगतीनं काम करणं त्याना शक्य झालं.

विशेषत: महाराष्ट्रातील बसस्थानकं अद्ययावत करणं, महिला सक्षमिकरणासाठी वैशिष्ट्‌यपूर्ण निर्णय घेणं, कित्येक कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी मिळवून घेणं. कोकाकोला कंपनी प्रकल्प जिल्ह्यात आणण्यासाठी प्रयत्न करणं किंवा परकीय गुंतवणुकीसाठी विदेशात भेटी देणं ह्या कामाच्या माध्यमातून तो जनतेच्या हितासाठी आणि त्यांच्या सुखकारक भविष्यासाठी प्रामाणिकपणाने काम करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा जनसेवा म्हणजेच ईश्वरसेवा हे तत्त्व मनाला पटतं.

आपलं कार्यक्षेत्र म्हणजे एक पवित्र ’तीर्थक्षेत्र’ तो समजतो आणि सुदृढ, निकोप आणिवसक्षम समाजनिर्मिती डोळ्यासमोर ठेऊन अविश्रांत खटपट करतो. परिस्थितीचं गांभीर्य समजून घेऊन, एक लोकप्रतिनिधी म्हणून वेगानं मदतकार्य मिळावं यासाठी तो जिवाची पर्वा न करता धाऊन जातो. महत्त्वपूर्ण निर्णय योग्यवेळी घेणं व त्याची हितकारक अंमलबजावणी करण्यासाठी योजना आखणं ही उदयची खासियत. त्यातील एक वाखाणण्यासारखा भाग म्हणजे राज्य लॉजिस्टिक मास्टर प्लान.

लॉजिस्टिक हा उद्योग विकासाचा महत्त्वाचा भाग. राज्यातील नव्या लॉजिस्टिक धोरणामुळे व्यापाराला मोठी चालना मिळणार. राज्य आर्थिक सल्लागार परिषदेच्या शिफारशीच्या धोरणांतर्गत राज्यात ५ लाखांपेक्षा अधिक रोजगारसंधी मिळणार आणि त्यामुळं महाराष्ट्रात देशांतर्गत व परदेशी गुंतवणूका आकर्षित केल्या जाणार. लॉजिस्टिकसाठी लागणारा वेळ कमी होणार व येणार्‍या एकूण खर्चात कापत होणार हा त्यामागचा 😄

हेतू राज्यात उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी उच्च तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्पांचा समावेश आहे व त्याचा फायदा कोंकण मराठवाडा विदर्भ या भागात गुंतवणुकीद्वारे मिळण्यासाठी शासनाचा हात आहे. यातून राज्यातील वीस हजार बेरोजगार तरुणांना रोजगार मिळून जातील. यासाठी उदय प्रयत्नरत आहे. स्टार्टअप उद्योजकांसाठी ’महाराष्ट्र हब’ हे देशातलं पहिलं उद्योजक आणि मार्गदर्शन केंद्र ठरणार आहे. तंत्रज्ञान, कौशल्य आणि नवीन उद्योगांचा विकास हे त्याचं उद्दिष्ट आणि गुणवत्तेच्या आधारे व्यवसायांच्या नवीन पद्धतीना प्रोत्साहन हे वैशिष्ट्‌य. या ठिकाणी विद्यार्थी व प्रशिक्षकांची शिक्षण आणि निवासाची सोय असेल. कार्यालयांसाठी जागा, सभागृह आणि इनडोअर, आऊटडोअर कार्यक्रम यासाठीही जागा उपलब्ध ठेवली जाईल.

आज प्रशिक्षण नसल्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळत नाही. खरं म्हणजे त्यांना नोकरीची गरज असते. पण गरजेप्रमाणं प्रशिक्षण मिळत नाही. त्यामुळं पुढं मागं हे मार्गदर्शन केंद्र येत्या काळात या विद्यार्थ्यांना

उपयोगी पडेल ही दूरदृष्टी उदयची.
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तसेच उद्योगमंत्री अशा दोन अत्यंत महत्त्वाच्या मंत्रिपदाच्या माध्यमातून उदयनं महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधीत्व केलं. तो परंपरा आणि संस्कृती जपणारा कार्यकर्ता. संतपरंपरा जपण्यासाठी पैठण येथे ’संत पीठ’ स्थापन करण्याचा फार मोठा निर्णय त्यानं घेतला. महाराष्ट्र राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी तरुणांना कौशल्याधारित शिक्षण, त्यांच्या व्यक्तिमत्व विकासात भर घालील याची त्याला खात्री असल्यानं उदयच्या पुढाकारानं आंतरराष्ट्रीय दर्जाचं मास्टर दीनानाथ संगीत महाविद्यालय सुरू करण्यात त्याला यश मिळालं.
महाराष्ट्राच्या उद्योग विभागात उदयच्या मागणीनुसार पुढाकाराने नवनवे अनेक प्रकल्प सुरू होत आहेत. आतंरराष्ट्रीय पातळीवर, नामांकित कंपनीच्या मुख्य प्रतिनिधीबरोबर चर्चा. त्यासंबंधीच्या बैठका यामध्ये उदय दंग असतो. उद्योग विकासासाठी परकीय गुंतवणुकीसाठी उदयला विदेशी दौरे करावे लागतात. दावोस, जर्मनी, तैवान, दक्षिण कोरिया, लंडन, स्वित्झर्लंड, व्हीएतनाम, जपान या देशांना ’यू गया यू आया’ ह्या सहजतेने जातो येतो. माझ्यासारखी आश्चर्यानं तोंड उघडं ’टाकून ही ’उडान’ पाहते आणि ’देव ताचे बरें करू असा आशीर्वाद देते. राजकारण हे त्याचं सध्याचं माध्यम ह्या माध्यमातून काम करताना लोकप्रतिनिधी या नात्यानं आपण समाजाचा एक भाग आहोत आणि म्हणूनच आपण समाजाचा एक अविभाज्य भाग आहोत या नात्यानं त्यांनं ‘उदय सामंत’ प्रतिष्ठानची मुहूर्तमेढ उभारली.
उदय प्रतिष्ठान माध्यमातून त्याच्या मार्गदर्शनाखाली पीडितांना मदतीचे कार्य चालतं. पूरग्रस्त, वादळग्रस्त ’कोरोनाग्रस्त’ ह्या संक्रमणकाळात संकटग्रस्त लोकांना दिलेली पूर्णान्न सेवा, पोलिस विभाग, महिला विभाग यांच्याकरता पुरवलेली आरोग्यसेवा, मोफत शस्त्रक्रिया यांचा इथं आवर्जून उल्लेख करावा लागतो. तसेच या प्रतिष्ठानामार्फत यशस्वी झालेले सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रम जनतेच्या मनात कायम स्थान मिळवून राहिले आहेत. निःस्पृहतेनं आणि निरपेक्ष व निरिच्छ भावनेनं काम करणारा उदय जनतेच्या अडचणी दूर करणारा उदय. समाजाच्या बांधिलकीचा पैसा जपणारा संवेदनशील मनाचा उदय. महाराष्ट्राचा उदय. येणार्‍या नव्या पिढीच्या रोजगार भविष्याचा विचार करणारा उदय. रत्नागिरी जिल्ह्याचं, महाराष्ट्राचं जनजीवन गतिमान बनविण्यासाठी आणि त्यांच्या सुलभ जीवनाचं आगाऊ नियोजन करणारा शिल्पकार डॉ. उदय स्वरुपा रविंद्र सामंत.
रत्नागिरीला वरदान लाभलेले निसर्गसौंदर्य, इथली संस्कृती, जीवनशैली, यांचा इतिहास एक आगळावेगळा, पारंपारिक कला, रंगीबेरंगी लोकजीवन स्व. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे जन्मस्थान असलेल्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर रविकिरणोदय आपल्या कुवतीनुसार माणुसकीचं नाव इथं जपत आहेत. मालगुण केशवसुतांची तुतारी हातात घेऊन ’नव्या दमाचा, नव्या युगाचा शूर शिपाई मी आहे’, असं म्हणून उदयची घोडदौड चालली आहे. जिथं जावं तिथं माझी भावंडं आहेत, असं मनाशी बाळगून ’वसुधैव कुटुंबकम’ अशी विशाल दृष्टी त्यांच्याकडं आहे.
‘जे खळांची व्यंकटी सांडो,
तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो मैत्र जीवाचे’

‘पसायदान रूपी ज्ञानेश्वरांचे मागणे तो
परमेश्वराकडे नेहमी मागतो. सात्विकता
आणि भावूकता असलेल्या त्यांच्या व्यक्तिमत्वावर आणि कार्यावर लोक विश्वास ठेवतात.

भरभरून आशीर्वाद देतात. त्याचं कल्याण इच्छितात. लोकांच्या शुभाशिर्वादामुळंच परमेश्वरानं त्याला एवढं मोठं मानाचंरं छत्र दिलं.

शिवकालीन वाघनखे भारतात आणण्यासाठी व्हिक्टोरिया आल्बर्ट वस्तुसंग्रहालय लंडन येथे सामंजस्य करार करणारा पद्मविभूषण रतनजी टाटा यांच्यासमवेत अनमोल ऐतिहासिक क्षण अनुभवणारा रत्नागिरीतील युवकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा याकरता उदय सामंत प्रतिष्ठानाच्यावतीने डॉ. रघुनाथ माशेलकरांना निमंत्रण देणारा, सात्विकतेवर नितांत श्रद्धा असणारा परमेश्वराचा आशीर्वादरूपी धडाडीचा महाराष्ट्र सेवक म्हणजे उदय. ’देश हीच माता’, ’देश जन्मदाता घडो देश सेवा ऐसी बुद्धी दे अनंता’ हा अनुकरणीय संदेश नवपिढीला आपल्या चालत्या बोलत्या व्यक्तिमत्वातून देणारा उदय.

आमच्या कुटुंबाची शान. आमचा अभिमान, आमचा सन्मान.
त्याला उदंड आयुष्य. निरामय मानसिक आणि शारीरिक आरोग्य लाभो. हीच परमेश्वराकडे प्रार्थना.