दाभोळ (रत्नागिरी) : कोळथरे येथील कृष्णामामा महाजन स्मृतिप्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठित कृष्णामामा महाजन स्मृति पुरस्कार यंदा दाभोळचे सुप्रसिद्ध डॉ. मधुकर लुकतुके यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला. हा १४वा पुरस्कार आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्या हस्ते दाभोळ येथे प्रदान करण्यात आला.

आरोग्य, उद्योजकता, समाज प्रबोधन आणि शिक्षण या क्षेत्रांत उत्तुंग कार्य करणाऱ्या अप्रकाशित व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. डॉ. लुकतुके यांनी १९६० ते २०२५ पर्यंत दाभोळमध्ये निस्पृह भावनेने सामान्य जनतेला आणि गरिबांना मोफत आरोग्यसेवा दिली. पैशांचा विचार न करता रुग्णांच्या गरजेनुसार उपचार करण्याची त्यांची खासियत होती. यामुळे त्यांना ‘डॉक्टरांमधला देवमाणूस’ आणि ‘बिनखुर्चीचे डॉक्टर’ अशी उपाधी मिळाली होती.

कृष्णामामा महाजन यांचे आयुष्यही समाजसेवेला समर्पित होते. ते आयुर्वेद अभ्यासक होते. एका समर्पित समाजसेवकाच्या नावाने दुसऱ्या समर्पित आरोग्यसेवकाला पुरस्कार मिळाल्याने दाभोळ परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

पुरस्कार वितरण प्रसंगी डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “कोकण ही नररत्नांची खाण आहे. हे दोन रत्न समकालीन असून त्यांचे ध्येय सामान्यांच्या कल्याणाचे होते.” तसेच, परिसरातील उत्तुंग कार्य करणाऱ्यांचा सन्मान करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य प्रतिष्ठान करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

डॉ. शेटे यांनी दापोलीकरांना विशेष भेट जाहीर करत प्रतिष्ठानच्या माध्यमातून ‘आयुष्मान केंद्र’ उभारण्याची घोषणा केली. या केंद्रामुळे दापोली तालुक्यातील गरीब रुग्णांना सरकारी आरोग्य योजनांचा लाभ मिळेल, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मृणाल गोंधळेकर, स्वागत अध्यक्ष बिपिन पाटणे, प्रास्ताविक कार्यवाह गंगाराम इदाते, सन्मानपत्र वाचन सीए कौस्तुभ दाबके आणि आभार मिहीर महाजन यांनी मानले. कार्यक्रमाला कोषाध्यक्ष दीपक महाजन, माजी आमदार डॉ. मोकल, दाभोळ सरपंच राखी तोडणकर यांच्यासह पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमानंतर डॉ. शेटे यांच्यासमवेत आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत अनौपचारिक चर्चासत्र घेण्यात आले.