सडवे (ता. दापोली) : रत्नागिरी जिल्हा परिषद पुरस्कृत कोळबांद्रे केंद्राच्या केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा सडवे येथे मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडल्या. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना क्रीडा कौशल्य दाखवण्यासाठी व्यासपीठ मिळावे या उद्देशाने दरवर्षी आयोजित होणाऱ्या या स्पर्धांना यंदाही उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.
स्पर्धेचे उद्घाटन सरपंच वसंत मेंगे, पोलीस पाटील रोशन पादड, तंटामुक्त समिती अध्यक्ष जयेंद्र कावणकर, ग्रामस्थ प्रतिनिधी सुरेश मेंगे व केंद्रप्रमुख संजय जंगम यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. उद्घाटकांनी शिक्षणाबरोबरच क्रीडा विकासाचे महत्त्व अधोरेखित करीत विद्यार्थ्यांना उत्स्फूर्त सहभाग घेण्यास प्रोत्साहित केले.

दिवसभर विविध वयोगटांतील धावणे, लांब उडी, गोळाफेक, खो-खो, कबड्डी आदी स्पर्धा झाल्या. केंद्रातील सर्व शाळांनी उत्साहाने भाग घेतला. यात जि.प. शाळा साखळोली क्र.१ च्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करीत ३६ पैकी १७ बक्षिसे मिळवून जनरल चॅम्पियनशिप पटकावली. त्यांच्या यशाचे उपस्थितांनी कौतुक केले.
बक्षीस वितरण प्रसंगी गावतळे प्रभागाचे शिक्षणविस्तार अधिकारी बळीराम राठोड यांनी मार्गदर्शन करताना महत्त्वाचे मत मांडले. ते म्हणाले, “क्रीडा स्पर्धेत हार-जीत ही सामान्य बाब आहे. मात्र केवळ निकालावर न थांबता गुणवंत खेळाडूंच्या नैपुण्याची ओळख करून घेणे गरजेचे आहे. एखादा संघ पराभूत झाला म्हणून त्यातील प्रतिभावंत खेळाडूंकडे दुर्लक्ष होता कामा नये. उलट अशा खेळाडूंची निवड करून त्यांना पुढील टप्प्यावर संधी देणे, हीच खरी क्रीडा संस्कृती आहे.” विजेत्यांचे अभिनंदन करीत श्री. राठोड यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या.

स्पर्धेचे यशस्वी आयोजन सडवे ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती, केंद्रातील शिक्षकवृंद व स्वयंसेवकांच्या अथक परिश्रमामुळे शक्य झाले. क्रीडांगणाची आकर्षक सजावट, विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन व शिस्तबद्ध व्यवस्था यामुळे स्पर्धा अतिशय सुरळीत पार पडल्या. केंद्रप्रमुख संजय जंगम हे अध्यक्षस्थानी होते.
कार्यक्रमाचे स्वागत मुख्याध्यापक शामराव वरेकर यांनी केले, तर आभार शिक्षक विकास पटले यांनी मानले.

