लाडघर (ता. दापोली) : दत्त सांस्कृतिक मंडळ लाडघरच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दत्तजयंतीनिमित्त आयोजित सायकल, धावणे आणि बैलगाडी शर्यती रविवारी ७ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी लाडघर समुद्रकिनाऱ्यावर उत्साहात पार पडल्या. तब्बल ५९ वर्षांची परंपरा असलेल्या या स्पर्धांना यंदाही प्रेक्षकांची प्रचंड गर्दी लाभली.

सायकल शर्यतीत प्रशांत पालवणकर (प्रथम), केतन पालवणकर (द्वितीय) आणि अक्षय मंडपे (तृतीय) यांनी बाजी मारली. धावण्याच्या मोठ्या गटात अथर्व बरजे, आयुष बरजे, रोशन राऊत तर लहान गटात श्रेयांग मोरे, रुद्र बोरकर आणि वीर नरवणकर यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक पटकावला. बैलगाडी शर्यतीत रुद्र सुबोध बोरकर, सचिन जाधव, प्रदीप नार्वेकर आणि नितेश बोरकर यांनी विजेतेपद मिळवले.

लाडघर बीचवरील सुक्या वाळू आणि वाऱ्याच्या विरोधात २ किलोमीटर अंतर पार करणे हे स्पर्धकांसाठी नेहमीच आव्हानात्मक असते. त्यामुळेच ही स्पर्धा अटीतटीची होते आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवते.

मंडळाचे अध्यक्ष दीपक बोरकर, उपाध्यक्ष नीलेश मोरे, सचिव राजन संनकुळकर यांनी सांगितले की, १९६५ पासून ही परंपरा अव्याहतपणे सुरू आहे. यंदाच्या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अभिनय कर्देकर, वृषाल सुर्वे, सुभाष पेडणेकर, उदय पेडणेकर, वैभव कर्देकर, विक्रांत नरवणकर तसेच लाडघरचे सर्व ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

सर्व विजेत्यांना बक्षिसे व चषक देऊन गौरवण्यात आले. मंडळाने नागरिकांना सायकलचा अधिक वापर, मैदानी खेळ आणि पर्यावरण संवर्धनाचे आवाहन केले.