दापोली: कोकणातील हापूस आंब्याला मिळालेले भौगोलिक मानांकन (GI) अबाधित ठेवण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि कोकण हापूस आंबा उत्पादक-विक्रेते सहकारी संस्था यांनी गुजरातमधील ‘वलसाड हापूस’च्या GI नोंदणीला कायदेशीर विरोध नोंदवला आहे.

भारतीय किसान संघ, गांधीनगर आणि नवसारी कृषी विद्यापीठ, गुजरात यांनी ९ फेब्रुवारी २०२५ रोजी ‘वलसाड हापूस’साठी GI रजिस्ट्री, चेन्नई यांच्याकडे अर्ज दाखल केला होता. त्याला उत्तर म्हणून कोकण कृषी विद्यापीठ व कोकण हापूस उत्पादक संस्थेने १४ ऑक्टोबर २०२४ रोजीच औपचारिक विरोध दाखल केला.

३० नोव्हेंबर २०२५ रोजी बौद्धिक संपदा भवन, मुंबई येथे झालेल्या सुनावणीत विद्यापीठाच्यावतीने ज्येष्ठ वकील अॅड. हिमांशु काणे यांनी कोकण हापूस/अल्फान्सो आणि वलसाड हापूस यातील तांत्रिक, वैज्ञानिक व कायदेशीर फरक स्पष्टपणे मांडले. कोकणातील विशिष्ट हवामान, जमीन आणि शास्त्रोक्त पीक पद्धतीमुळेच हापूसला त्याची खास चव, रंग, सुगंध व स्वाद प्राप्त होतो, जो इतर कोणत्याही प्रदेशात येत नाही, हे पुराव्यांसह सिद्ध करण्यात आले.

सुनावणीत सकारात्मक चर्चा झाल्याने कोकण हापूसचे GI मानांकन (Alphonso Konkan Hapus – GI No.139) निश्चितच अबाधित राहील, असा विश्वास विद्यापीठाने व्यक्त केला आहे. विरोधी पक्षाला आपले म्हणणे सादर करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. जर निकाल प्रतिकूल आला तर विद्यापीठ सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

कोकणातील पाच जिल्ह्यांसाठी (रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, ठाणे) २०१८ मध्ये मिळालेले ‘अल्फान्सो कोकण हापूस’ हे GI मानांकन कोकण कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांसह मिळवलेले आहे. कोकणाबाहेर कलमे गेल्याने त्या-त्या प्रदेशात ‘हापूस’ नाव लावून GI मिळवण्याचे प्रयत्न होत असल्याने कोकणच्या शेतकऱ्यांवर अन्याय होईल, असे विद्यापीठाचे म्हणणे आहे.